द्वीपसमुहांच्या सुरक्षेसाठी जपान-अमेरिकेकडून ‘आयर्न फिस्ट’ सरावाची घोषणा

‘आयर्न फिस्ट’टोकिओ – ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील आपल्या द्वीपसमुहांचे नियंत्रण राखण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी जपान आणि अमेरिकेमध्ये विशेष सराव पार पडणार आहे. ‘आयर्न फिस्ट’ या सरावात अमेरिकेसह जपानचे हवाई तसेच नौदल पथक सहभागी होणार आहे. तैवानजवळच्या जपानच्या बेटांच्या सुरक्षेचा विचार करून या सरावाची आखणी करण्यात आली आहे. जपानने जाहीर केले नसले तरी या सागरी क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्याची तयारी या सरावातून केली जाणार आहे. दरम्यान, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ अधिकारी गुआम येथे चीनविरोधी बैठकीसाठी जमा झाल्याचा दावा केला जातो.

2006 सालापासून अमेरिकेचे संरक्षणदल ‘आयर्न फिस्ट’ नामक सरावाचे आयोजन करीत आहे. यामध्ये भारत व फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. तर ‘आयर्न फिस्ट ॲम्फिबियस’ सरावात अमेरिकेचे हवाईदल, नौदल तसेच मरिन्स स्वतंत्रपणे अभ्यास करीत होते. पण पहिल्यांदाच या ॲम्फिबियस सरावात अमेरिकेने जपानला आमंत्रित केले आहे. दोन आठवड्यानंतर 16 फेब्रुवारी ते 12 मार्च दरम्यान हा सराव पार पडेल. या सरावात जपानच्या ॲम्फिबियस पथकाचे सुमारे 800 तर अमेरिकेच्या मरिन्स कॉर्प्सचे 900 जवान सहभागी होतील. ॲम्फिबियस नौकांसह पॅराड्रॉपींगचे प्रकारही या सरावात केले जातील.

‘आयर्न फिस्ट’जपानच्या कागोशिमा प्रिफेक्चरच्या किकाई बेटावर या सरावाचे आयोजन केले जाणार आहे. तर या सरावाचा काही टप्पा ओकिनावा प्रिफेक्सचरवरील अमेरिकन मरिन्सच्या ‘कॅम्प हॅन्सन’ तळावर पार पडेल. कागोशिमा आणि ओकिनावा हे दोन्ही नान्सेई द्वीपसमुहाचा भाग ठरतात. तर नान्सेई द्वीपसमुह जपानच्या क्युशू प्रांताचा भाग ठरतात. हा द्वीपसमुह तैवानच्या सागरी किनारपट्टीपासून अतिशय जवळ आहे. येथील बेटांवर जपानचे प्रशासन असून यावर जपानने आपल्या लष्करालाही तैनात केले आहे. त्यामुळे सदर हा सराव जपानसह तैवानच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असल्याचा दावा केला जातो.

साऊथ चायना सी आणि पॅसिफिक महासागराला वेगळ्या करणाऱ्या नान्सेई द्वीपसमुहाच्या हद्दीत या सरावाचे आयोजन करून जपान व अमेरिकेने चीनला इशारा दिल्या दावा केला जातो. काही आठवड्यांपूर्वीच चीनच्या नौदलाने ओकिनावा बेटांजवळून प्रवास केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या गुआम बेटाच्या हद्दीपर्यंत चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने सफर केली होती. चिनी युद्धनौकेच्या या प्रवासावर अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेने आपल्या मित्र व सहकारी देशांसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नव्या लष्करी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अमेरिकेच्या नौदलातील ‘युएसएस निमित्झ’ या अजस्त्र विमानवाहू युद्धनौकेने आपल्या विनाशिका व पाणबुड्यांच्या ताफ्यासह साऊथ चायना सीतून गस्त घातली आहे. दोन दिवसांपूर्वीच निमित्झ युद्धनौकेवरील एफ/ए-18 हॉर्नेट लढाऊ विमाने आणि एमएच-60 सीहॉक हेलिकॉप्टर्सनी येथील हवाई क्षेत्रातून भरारी घेतली. यावेळी अमेरिकन वैमानिकांनी ‘फॉझी बिअर’, ‘पिग स्वीट’ आणि ‘बोंगू’ अशा सांकेतिक भाषांचा वापर केला. हवाई गस्तीवेळी वैमानिकांकडून सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. पण अमेरिकन वैमानिकांनी वापरलेले शब्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हिणवण्यासाठी असल्याचा दावा केला जातो.

हिंदी

leave a reply