नाटो रशियाबरोबरील युद्धासाठी तयार आहे

- नाटोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रशियाला इशारा

रशियाबरोबरील युद्धासाठीब्रुसेल्स – ‘नाटोचा पवित्रा बदललेला आहे, हे रशियाने लक्षात घ्यावे. रशियाने नाटोची मर्यादारेषा ओलांडली तर रशियाबरोबर युद्धासाठी नाटो तयार आहे’, असा इशारा नाटोचे वरिष्ठ अधिकारी रॉब बाव्‌‍र यांनी दिला आहे. रशियाविरोधी रणनीतिचा भाग म्हणून अमेरिका व नाटो युक्रेनचा वापर करीत आहे. अन्यथा अमेरिका व नाटोला युक्रेन तसेच इतर युरोपिय देशांच्या सुरक्षेशी देणेघेणे नाही, अशी टीका युरोपातून होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आपले सदस्य असलेल्या युरोपिय देशांच्या संरक्षणासाठी नाटो वचनबद्ध असल्याची ग्वाही या संघटनेकडून दिली जाते. रॉब बॉव्‌‍र यांनी केलेली विधाने हा दावा अधोरेखित करणारी आहेत.

अमेरिकेसह जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, पोलंड, स्पेन या देशांनी युक्रेनला रणगाडे पुरविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात युक्रेनला तीनशेहून अधिक रणगाडे मिळणार असून रशियाविरोधी युद्धासाठी अब्जावधी डॉलर्सची प्रगत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्यदेखील पाश्चिमात्य देश युक्रेनला पुरविणार आहेत. नाटोचे सदस्य असलेल्या देशांकडून युक्रेनला मिळणारे हे लष्करी साहित्य म्हणजे नाटोने रशियाच्या विरोधात युद्धात उतरण्यासारखेच ठरते, असा दावा रशियन नेते करीत आहेत. याचे परिणाम या देशांना सहन करावे लागतील, असा इशाराही रशियन नेत्यांनी दिला आहे.

रशियाबरोबरील युद्धासाठीअशा परिस्थितीत पोर्तुगीज वृत्तवाहिनीने नाटोचे प्रमुख अधिकारी असलेल्या रॉब बॉव्‌‍र यांना ‘तुम्ही रशियाबरोबरील युद्धासाठी तयार आहात का?’ असा प्रश्न केला. त्याला बॉव्‌‍र यांनी होकारार्थी उत्तर दिले. रशियाने नाटोची मर्यादारेषा ओलांडता कामा नये. नाटोच्या सदस्यदेशांपर्यंत रशिया येऊन ठेपला तर रशियाबरोबरील संघर्षासाठी नाटो सज्ज आहे. स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरिया या युरोपिय देशांमध्ये नाटोने आपल्या ‘बॅटलग्रूप्स’ अर्थात लष्करी पथकांची संख्या वाढवली आहे. नाटोने आपला पवित्रा बदललेला आहे, हे रशियाने लक्षात घ्यायला हवे, असे सांगून बाव्‌‍र यांनी नाटोने रशियाबरोबरील युद्धाची तयारी केल्याचा दावा केला.

अमेरिका व नाटोने युक्रेनला अधिकाधिक शस्त्रे पुरविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, रशियाने ही शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य युक्रेनी लष्करापर्यंत पोहोचणारच नाही, अशा तीव्रतेचे घणाघाती हल्ले चढविण्याची तयारी केली आहे. यामध्ये ज्या देशांकडून ही शस्त्रास्त्रे युक्रेनपर्यंत पोहोचतील, त्या देशांमध्येच हल्ले चढविण्याची योजना रशियाने आखल्याचा दावा केला जातो. त्याचा दाखला देऊन रॉब बाव्‌‍र यांनी नाटोच्या सदस्यदेशांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा रशियाला दिल्याचे दिसत आहे. मात्र युक्रेनमध्ये रशिया युक्रेनी लष्कराशी नाही, तर नाटोशीच लढत असल्याचे रशियन नेतृत्त्व वारंवार स्पष्ट करीत आहे. पण आता युक्रेनमध्ये अमेरिका व नाटोशी रशियन लष्कराची थेट टक्कर होण्याची शक्यता बळावल्याचे रशियाने बजावले होते. तसेच या युद्धासाठी रशियाने पूर्ण तयारी केल्याच्या बातम्याही सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर, रशियाशी संघर्ष करण्याची तयारी आपण करून ठेवलेली आहे, असे दावे नाटोकडून केले जात आहेत.

खरोखरच रशिया व नाटोमध्ये युद्ध भडकले तर त्याचे भयंकर परिणाम युरोपिय देशांनाच नाही, तर साऱ्या जगाला भोगावे लागतील. या युद्धाचे रुपांतर अणुयुद्धात होऊ शकते, असे इशारे आंतरराष्ट्रीय पातळीवरून दिले जात आहेत.

हिंदी

leave a reply