जिनपिंग यांची दीर्घकालिन एकाधिकारशाही कम्युनिस्ट पार्टीच्या र्‍हासाचे कारण ठरेल – विश्‍लेषकांचा इशारा

बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीवरील शी जिनपिंग यांची दीर्घकालिन एकाधिकारशाही पक्षाच्या र्‍हासाचे कारण ठरेल, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. 1 जुलै रोजी कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी राजवटीकडून महत्त्वाकांक्षी व भव्यदिव्य कार्यक्रमांची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाबाबत परदेशी अभ्यासक व विश्‍लेषकांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

र्‍हासाचे कारणजिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीची सूत्रे स्वीकारल्याच्या घटनेला पुढच्या वर्षी एक दशक पूर्ण होईल. कम्युनिस्ट पार्टीच्या मूळ घटनेनुसार जिनपिंग यांनी पुढच्या वर्षी आपला वारसदार जाहीर करणे किंवा तसे संकेत देणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षात जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीत केलेले बदल पाहता ते असा निर्णय घेण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. 2012 साली सत्तेवर आल्यानंतर जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख म्हणून पक्षावरील आपली पकड घट्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यात विरोधकांना संपविण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा वापर, पार्टीच्या प्रमुख पदासाठी असणारी कालमर्यादा काढून टाकणे, स्वतःला ‘कोअर लीडर’ म्हणून घोषित करणे आणि आपली विचारसरणी पक्षाच्या घटनेत सामील करणे, यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे करताना जिनपिंग यांनी पक्षात आपल्याला आव्हान देईल, असे नेतृत्त्व तयार होऊ दिलेले नाही. इतकेच नाही तर पक्षात वरिष्ठ तसेच महत्त्वाचे पद भूषविणार्‍या सदस्यांचीही त्यांनी हकालपट्टी केली. त्यामुळे जिनपिंग यांच्यानंतर कम्युनिस्ट पार्टीत अस्थैर्य निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जिनपिंग यांचा वारसदार कोण यासंदर्भातील प्रक्रिया व रचना योग्यरित्या ठरलेली नसणे हे कम्युनिस्ट पार्टीच्या भवितव्यासाठी हानिकारक ठरेल, असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’मधील अभ्यासक स्टीव्ह त्सँग यांनी बजावले. ‘मर्केटर इन्स्टिट्यूट ऑफ चायना स्टडिज्’मधील विश्‍लेषक निस गु्रएनबर्ग यांनीही त्याला दुजोरा दिला. ‘जिनपिंग यांनी त्यांचा दृष्टिकोन पक्ष व देशात रुजविण्यासाठी नेतृत्त्वावरील कालमर्यादा काढून टाकली. पण त्यांच्या निर्णयामुळे नेतृत्त्वाच्या निवडीशी संबंधित यंत्रणेत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. जिनपिंग गेल्यानंतर ही बाब पार्टीला मोठे हादरे देणारी ठरु शकते’, असे ग्रुएनबर्ग यांनी म्हंटले आहे.

र्‍हासाचे कारण

अमेरिका व ऑस्ट्रेलियातील अभ्यासगटांनीही जिनपिंग यांच्या नेतृत्त्वासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात, जिनपिंग यांनी केवळ स्वतःचे नेतृत्त्व बळकट करण्यावर भर दिला पण संपूर्ण देशाला अस्थैर्याच्या संकटाकडे ढकलले, असा आरोप करण्यात आला आहे. ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक इंटरनॅशनल स्टडिज्’ व ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने तयार केलेल्या या अहवालात जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीमुळे चीनचे राजकीय भवितव्य अनिश्‍चिततेच्या धुक्यात वेढले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील नेतृत्त्वाच्या समस्येचे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर व दूरगामी असू शकतात, याकडे या अभ्यासगटांनी लक्ष वेधले आहे.

गेल्या वर्षभरात कम्युनिस्ट पार्टीतील विविध स्तरांवरून जिनपिंग यांना होणारा विरोध वाढल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत आहेत. कम्युनिस्ट पार्टीतील ज्येष्ठ नेते वेन जिआबाओ, रेन झिकिआंग, वरिष्ठ सदस्य ‘काई शिआ’, लष्करी अधिकारी जनरल ‘दाई शी’ यांच्यासह पंतप्रधान ली केकिआंग यांनीही जिनपिंग यांच्या एकतंत्री कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली होती. वरिष्ठ सदस्य ‘काई शिआ’ यांनी तर जिनपिंग यांना कंटाळून कम्युनिस्ट पक्षातील अनेक सदस्य व नेते बाहेर पडण्यास तयार असल्याचा इशारा दिला होता.

leave a reply