अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर चीनची चिंता

बीजिंग – अमेरीकेची अफगाणिस्तान माघार अतिशय घाईगडबडीत सुरु असून, त्यामुळे अफगाणी शांती प्रक्रिया व क्षेत्रीय स्थैर्य यावर गंभीर परिणाम झाल्याची टीका चीनने केली आहे. या प्रकरणात संयुक्त राष्ट्रसंघटनेने योग्य भूमिका बजावावी, असे आवाहनही चीनने केले. चीन व पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये फोनवर झालेल्या संभाषणात चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. भारत व पाकिस्तानचा समावेश असलेल्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ या गटानेही अफगाणिस्तानच्या स्थितीकडे लक्ष द्यावे, असेही चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी म्हंटले आहे.

सैन्यमाघारीवर चीनची चिंताओसामा बिन लादेनला संपविणे आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन उद्दिष्टांसाठी अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानात पाऊल ठेवले होते. ही दोन्ही उद्दिष्टे गाठण्यात अमेरिका यशस्वी ठरली. आता अफगाणिस्तानातील युद्ध कायमस्वरुपी संपवून आपल्या जवानांना घरी बोलविण्याची वेळ आली आहे’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या महिन्यात केली होती. १ मे पासून अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार सुरू होईल. ही सैन्यमाघार टप्प्याटप्प्याने केली जाईल. यात कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही. ११ सप्टेंबरआधी ही सैन्यमाघार पूर्ण होईल, असे बायडेन यांनी स्पष्ट केले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय बायडेन यांनी कायम ठेवल्याने अमेरिकी नेत्यांसह अनेकांनी बायडेन यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

चीनने केलेल्या टीकेमागे झिंजिआंग प्रांतातील उघुरवंशियांचा मुद्दा हे कारण असल्याचे सांगण्यात येते. चीनचा झिंजिआंग प्रांत अफगाण सीमेशी जोडलेला आहे. गेल्या काही महिन्यात अफगाणिस्तान आयएस ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. झिंजिआंगमधील शेकडो उघुरवंशीय आयएसमध्ये सामील झाल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यास आयएस परत अफगाणिस्तानात आक्रमक होईल व त्याच्या सहाय्याने उघूरवंशीय झिंजिआंगमध्ये हल्ले करतील, अशी चिंता चीनला भेडसावते आहे. त्यामुळेच चीनने अमेरिकेच्या माघारीला लक्ष्य केले आहे.

सैन्यमाघारीवर चीनची चिंताअफगाणिस्तानबाबत चीन दाखवित असलेले स्वारस्य हा अतिशय लक्षणीय मुद्दा ठरतो. अफगाणिस्तानच्या खनिजसंपत्तीवर चीनचा डोळा आहे, हे याआधी अनेकवार उघड झाले होते. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर, अफगाणिस्तानातील आपले सुरक्षाविषयक आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी चीन विशेष उत्सुक असल्याच्या बातम्या येत आहेत. यासाठी आवश्यकता भासलीच तर चीन अफगाणिस्तानात आपले लष्कर तैनात करू शकेल, असे दावे काही विश्‍लेषकांनी केले होते.

त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीचा चीनकडून दिला जाणारा दाखला, म्हणजे आपले डावपेच प्रत्यक्षात उतरविण्याची चीनची तयारी असण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानचा वापर करून चीन इराणपासून मध्य आशियाई देशांपर्यंत आपल्या प्रभावाचा विस्तार करू शकेल. मात्र काहीही झाले तरी अमेरिका चीनला अफगाणिस्तानात शिरकाव करू देणार नाही, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. आपल्या सैन्यमाघारीनंतरही अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हितसंबंधांचे रक्षण केले जाईल, असे आश्‍वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्यमाघारीची घोषणा करतानाच दिले होते.

leave a reply