संरक्षणदलांचे संयुक्त थिएटर कमांड ही काळाची गरज

-लष्करप्रमुख जनरल नरवणे

सिकंदराबाद – तीनही दलांच्या प्रमुखपदासाठी संरक्षणदलप्रमुखांची (सीडीएस) नियुक्ती केल्यानंतर देशाच्या संरक्षणाला अधिक प्रभावरित्या बनविण्यासाठी संरक्षणदलांचे संयुक्त थिएटर कमांड उभारणे ही काळाची गरज बनली आहे. युद्ध आणि शांततेच्या काळात तीनही दलांच्या क्षमता आणि सज्जतेचे समन्वय साधण्यासाठी संयुक्त थिएटर कमांडची स्थापना करणे, हे संरक्षणदलांच्या सुधारणांमधील अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी दिली. आधुनिक युद्ध लढण्यासाठी संयुक्त थिएटर कमांड अपरिहार्य असल्याचे लष्करप्रमुखांनी अधोरेखित केले. त्यामुळे भविष्यात तीनही सैन्यदल संयुक्तपणे लढण्याच्या नव्या पर्यायांवर विचार करीत असल्याचे संकेत लष्करप्रमुखांच्या विधानातून मिळत आहेत.

संरक्षणदलांचे संयुक्त थिएटर कमांड ही काळाची गरजभारत हा जगातील सर्वात मोठी सैन्यसंख्या असलेला दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. भारताच्या संरक्षणदलात १३ लाखाहून अधिक सैनिकांचा समावेश असून एवढ्या मोठ्या सैन्यसंख्येच्या समन्वयासाठी संयुक्त थिएटर कमांडची गरज असल्याची संकल्पना याआधीच मांडण्यात आली होती. जगभरातील रणनीति आणि युद्धतंत्र बदलत चाललेली असताना, स्पेस कमांड किंवा अंतराळातील युद्धाकडेही गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, भारताने संरक्षणदलांमधील सुधारणांकडे लक्ष पुरविण्याचा मुद्दा याआधी संरक्षण मंत्रालय व तीनही दलांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता.

काही महिन्यांपूर्वी भारताने पहिल्यांदाच ‘सीडीएस’ची नियुक्ती, सैन्यविषयक व्यवहार विभागाची स्थापना तसेच स्पेस कमांडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले होते. आधुनिक युद्धतंत्राच्या काळात देशाने सामरिकदृष्ट्या घेतलेले हे अत्यंत लक्षवेधी निर्णय मानले जात होते. मात्र संयुक्त थिएटर कमांडच्या प्रश्नावर कोणतीही भूमिका स्वीकारण्यात आली नव्हती. मात्र, सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट आणि बायसन डिव्हिजनच्या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी संयुक्त थिएटर कमांडबाबत आपले मत मांडले.

संयुक्त नेतृत्त्वाअंतर्गत एकात्मिक नियोजन आणि ऑपरेशन्सवर आधारित आधुनिक युद्धाच्या आवश्यकता पूर्ण करणे ही संयुक्त थिएटर कमांडची मूळ संकल्पना असल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. या संयुक्त थिएटर कमांडमध्ये तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांऐवजी संबंधित दलांचे घटक एका नेतृत्वाखाली कार्यरत असतील, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी दिली. या संयुक्त थिएटर कमांडबाबत आपण उत्सुक असून यामुळे तीनही सैन्यदलांमध्ये समन्वय प्रस्थापित होऊन भविष्यातील युद्धात चांगले परिणामही मिळतील, असा विश्वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला. या संयुक्त थिएटर कमांडसाठी काही काळ लागणार असल्याचेही जनरल नरवणे म्हणाले.

दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी संयुक्त थिएटर कमांडबाबत महत्त्वाची घोषणा केली होती. देशाच्या सुरक्षेसाठी पाच थिएटर कमांडची आवश्यकता असल्याचे संरक्षणदलप्रमुखांनी अधोरेखित केले होते. यामध्ये सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र थिएटर कमांड असेल, असेही जनरल रावत म्हणाले होते.

leave a reply