‘कारिश’सह इस्रायलची प्रत्येक ठिकाणे हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहेत

- हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याची धमकी

हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्रांच्याबैरूत – ‘भूमध्य समुद्रातील कारिश इंधन क्षेत्रावरच नाही तर इस्रायलची सागरी आणि जमिनीवरील प्रत्येक ठिकाणे हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्रांच्या अचूक टप्प्यात आहेत’, अशी धमकी हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने दिली. त्याचबरोबर इस्रायलच्या विरोधात मोठी प्रतिकार यंत्रणा उभारल्याचा दावा हिजबुल्लाहच्या प्रमुखाने केला. इस्रायलने भूमध्य समुद्रातील कारिश इंधन क्षेत्रात सुरू केलेल्या उत्खननाला उद्देशून नसरल्लाने हा इशारा दिला आहे.

भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ या इंधनवायूने समृद्ध असलेल्या क्षेत्रावरुन इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये वाद भडकला आहे. इस्रायलच्या हैफा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सागरी क्षेत्रात 30 कोटी बॅरल्सहून अधिक इंधनवायूचा साठा असल्याचा दावा केला जातो. इस्रायलने कारिश क्षेत्रातील इंधनवायूचे उत्खनन करण्यासाठी ब्रिटीश कंपनीसह करार केला होता. गेल्या महिन्यात येथील इंधनवायूचे उत्खनन सुरूही झाले होते. काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी या इंधन क्षेत्राचा हवाई दौरा केला होता. पण सदर इंधन क्षेत्र लेबेनॉनच्या हद्दीत असल्याचा दावा हिजबुल्लाह करीत आहे. तसेच इस्रायलने आपल्या परवानगीशिवाय या क्षेत्रात इंधनाचे उत्खनन सुरू करू नये, असे बजावले होते. या क्षेत्रातील इस्रायलच्या कारवाया चिथावणीखोर आणि आक्रमक असल्याचे सांगून लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी इस्रायलला गंभीर परिणामांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता. तर या वादग्रस्त सागरी क्षेत्राप्रकरणी अमेरिकेच्या मध्यस्थीची मागणी लेबेनॉनने केली होती.

हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्रांच्यापण लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष एऑन यांचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने उघडपणे इस्रायलला धमकी दिली आहे. याआधीही हिजबुल्लाहच्या प्रमुखाने इस्रायलच्या अतिदूर शहरांवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याचा इशारा दिला होता. तर दहा दिवसांपूर्वी हिजबुल्लाहने कारिश इंधन क्षेत्रात ड्रोन्स प्रक्षेपित केले होते. हिजबुल्लाहने ड्रोन्सच्या सहाय्याने सदर इंधन क्षेत्रावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप इस्रायलने केला होता. पण यावेळी नसरल्लाने भूमध्य समुद्रातील कारिश इंधनक्षेत्रही आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याचे जाहीर करून गंभीर इशारा दिला आहे.

दरम्यान, इराण हिजबुल्लाह व हमासचा वापर करुन इस्रायलवर हल्ला चढवू शकतो, अशी चिंता इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी याआधीच व्यक्त केली होती.

leave a reply