अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील दूतावासासमोर खलिस्तानी विघटनवाद्यांची निदर्शने

- भारतीय पत्रकाराला लक्ष्य केले

वॉशिंग्टन – लंडन आणि अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोनंतर वॉशिंग्टनमध्ये देखील भारतीय दूतावासासमोर खलिस्तानी विघटनवाद्यांनी निदर्शने केली. यावेळी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया-पीटीआय’चे पत्रकार ललित झा यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण चिघळले नाही. मात्र भारताच्या अमेरिकेतील दूतावासाने याचा निषेध केला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व ऑस्ट्रेलिया या सारख्या देशांमध्ये भारताचे दूतावास व उच्चायुक्तालयांसमोर वारंवार निदर्शने करून हे विघटनवादी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेऊ पाहत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा उघड झाले.

अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील दूतावासासमोर खलिस्तानी विघटनवाद्यांची निदर्शनेवॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने या निदर्शनांचा तीव्र शब्दात निषेध केला. त्याचवेळी भारतीय पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर त्यांचा बचाव करणाऱ्या स्थानिक पोलीस व सुरक्षा दलांचे भारतीय दूतावासाने आभार मानले. या प्रकरणामुळे तथाकथित खलिस्तानवाद्यांचा हिंसक चेहरा जगासमोर आल्याचा दावा भारतीय दूतावासाने केला. पीटीआयचे पत्रकार ललित झा दूतावासासमोरील निदर्शनांचे वार्तांकन करीत असताना, आमचे व्हिडिओ काढून तुम्ही ते भारत सरकारला दाखवता, असा आक्षेप निदर्शकर्त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून या खलिस्तानी विघटनवाद्यांची ओळख पटवून त्यांचे भारतीय पासपोर्ट रद्द करावे, अशी मागणी माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. तसेच अशा विघटनवाद्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात यावा व त्यांना भारताकडून मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा देखील बंद करण्यात याव्या, अशी जोरदार मागणी सुरू झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर, आपली निदर्शने टिपणाऱ्या भारतीय पत्रकाराला या विघटनवाद्यांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे. याआधी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या निदर्शनांमध्ये काही विघटनवाद्यांनी मास्क लावून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, कॅनडामध्ये झालेल्या भारतविरोधी निदर्शनांप्रकरणी भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले. कॅनडातील भारताच्या उच्चायुक्तालयात घुसून तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी भारताने केली.

एकाएकी खलिस्तानी विघटनवाद्यांच्या या वाढत्या निदर्शनांमागे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयचा हात असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्याचवेळी या निदर्शकांवर कठोर कारवाई करण्याचे टाळून ब्रिटन तसेच कॅनडासारखे देश भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही चिन्हे दिसत आहेत. याची जाणीव असलेल्या भारताने हा मुद्दा सदर देशांकडे उपस्थित केला असून ब्रिटनच्या नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयाला दिलेल्या सुरक्षेत भारताने कपात केली आहे.

असे असले तरी अजूनही खलिस्तानी विघटनवाद्यांच्या भारतविरोधी निदर्शनांना फारसे यश मिळालेले नाही. पुन्हा एकदा भारतात खलिस्तानची मागणी करून अशांतता व हिंसाचार माजविण्याचे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत, असे विश्लेषक सांगत आहेत.

भारताच्या पंजाबमधील परिस्थितीबाबत खोटेनाटे दावे करून परदेशातील काही मूठभर खलिस्तानी विघटनवाद्यांनी भारताच्या विरोधात अपप्रचाराची मोहीम छेडलेली आहे. कुणीही पंजाबमधील परिस्थितीबाबत खातरजमा करून घेऊ शकतो, पंजाब सुरक्षित आहे. कुणीही खलिस्तानवाद्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने बजावले होते.

इतर देशांमधील भारतीय दूतावास देखील वारंवार ही माहिती उघड करून खलिस्तानवाद्यांच्या अपप्रचाराला उत्तर देत आहेत. तर खलिस्तानी विघटनवाद्यांची निदर्शने सुरू असतानाच, प्रखर राष्ट्रवादी भारतीय त्याला तिथल्या तिथेच प्रत्युत्तर देत असल्याचेही उघड झाले होते. यामुळे हे विघटनवादी अधिकच अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

यामुळे विघटनवाद्यांची निदर्शने अधिकाधिक हिंसक बनत चालली आहे. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया द्यावी, अशी त्यांची अपेक्षा असून भारताचे परराष्ट्र मंत्रालय याला अवास्तव महत्त्व देण्याचे टाळत आहे. त्याचवेळी ही निदर्शने सुरू असलेल्या देशांवर भारतीय दूतावास व उच्चायुक्तालयांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, याची आठवण भारत करून देत आहे. हे देश आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, काही देश आपल्या व इतरांच्या सुरक्षेबाबत दुटप्पी धोरण स्वीकारत असल्याची टीका परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतीच केली होती.

हिंदी

English

 

leave a reply