ट्युनिशिआनजिक दोन बोटी उलटून झालेल्या दुर्घटनेत ३० निर्वासितांचा बळी

ट्युनिस – ट्युनिशिआतील सागरी क्षेत्रात दोन बोटी उलटून झालेल्या दुर्घटनेत किमान ३० निर्वासितांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी या बोटी उलटल्याची माहिती ट्युनिशिआतील यंत्रणांनी दिली. गुरुवार ते शनिवार अशा तीन दिवसांमध्ये ट्युनिशिआच्या सागरी क्षेत्रात जवळपास सात बोटी उलटल्या असून त्यात ५०हून अधिक जणांचा बळी गेला आहे. बळींमध्ये आफ्रिकी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे सांगण्यात येते.

ट्युनिशिआनजिक दोन बोटी उलटून झालेल्या दुर्घटनेत ३० निर्वासितांचा बळीगेल्या महिन्यात इटलीच्या दक्षिण भागातील कॅलाब्रिआ प्रांतात झालेल्या जहाज दुर्घटनेत सुमारे ९० निर्वासितांचा बळी गेला होता. या दुर्घटनेने आफ्रिकेतून युरोपिय देशांमध्ये बेकायदेशीररित्या घुसणाऱ्या निर्वासितांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. मार्च महिन्यात दक्षिण युरोपमधील पाच देशांनी बैठक घेऊन युरोपिय महासंघ याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे टीकास्त्र सोडले होते. या पार्श्वभूमीवर ट्युनिशिआत एकापाठोपाठ घडलेल्या दुर्घटना लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात.

आफ्रिकेतील लिबिया व ट्युनिशिआ या देशांमधून युरोपिय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे घुसत आहेत. लिबियाच्या तटरक्षक दलाने गेल्या काही महिन्यात निर्वासितांच्या बोटींविरोधात आक्रमक कारवाईची मोहीम राबविली आहे. त्यामुळे निर्वासितांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी आपला मोर्चा ट्युनिशिआकडे वळविल्याचे समोर येत आहे. २०२२ साली पहिल्या दोन महिन्यात ट्युनिशिआतून १३०० निर्वासित इटलीत दाखल झाले होते. मात्र २०२३ साली हीच संख्या १२ हजारांवर गेली आहे.

ट्युनिशिआनजिक दोन बोटी उलटून झालेल्या दुर्घटनेत ३० निर्वासितांचा बळीट्युनिशिआच्या यंत्रणांकडून निर्वासितांच्या तस्करीचा मुद्दा गांभीर्याने हाताळण्यात आलेला नाही. त्याचवेळी सागरी सुरक्षेकडेही ट्युनिशिआ सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे फावले असून ट्युनिशिआ युरोपातील निर्वासितांसाठी नवा मार्ग म्हणून समोर आला आहे. मात्र हा मार्ग फारसा सुरक्षित नसल्याचे गेल्या तीन दिवसांमधील जहाज दुर्घटनांमधून उघड झाले. गेल्या वर्षी भूमध्य सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या सुमारे दीड हजार निर्वासितांचा जहाज दुर्घटनेत बळी गेला होता.

ट्युनिशिआच्या सागरी क्षेत्रात जहाज दुर्घटना घडत असतानाच इटलीतील बंदरात अवघ्या २४ तासांमध्ये दोन हजारांहून अधिक निर्वासित दाखल झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. हा निर्वासितांच्या घुसखोरीचा नवा विक्रम असल्याची माहिती इटलीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हिंदी

 

leave a reply