लडाखच्या ‘एलएसी’वर भारतीय संरक्षणदलांच्या समन्वयाचा परिणाम दिसू लागला

- वायुसेनेच्या अधिकार्‍याचा दावा

नवी दिल्ली – लडाखच्या ‘एलएसी’वर भारत आणि चीनचे लष्कर एकमेकांसमोर खडे ठाकलेले असताना, भारतीय संरक्षणदलांमधील समन्वय ही देशासाठी फार मोठी जमेची बाब ठरते आहे. लष्कर मागणी करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्वरीत पुरवठा करा, असे आदेश वायुसेनेला देण्यात आलेले आहेत व ‘एलएसी’वर त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत, असे सांगून वायुसेनेच्या एका अधिकार्‍याने त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

‘एलएसी’वर

भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल यांच्यातील संपर्क व समन्वय अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी झपाट्याने पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार भारताने ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ अर्थात संरक्षणदलप्रमुख हे पद तयार केले असून जनरल बिपीन रावत भारताचे पहिले संरक्षणदलप्रमुख बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, लडाखच्या ‘एलएसी’वर चीनबरोबरील तणाव कमालीचा वाढलेला असताना, लष्कर व वायुसेनेमधील समन्वय व सहकार्य निर्णायक ठरत असल्याची स्वागतार्ह बाब समोर येत आहे. लडाखच्या ‘एलएसी’वर तैनात असलेल्या सैनिकांना आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मागणीनुसार त्वरीत पुरवठा केला जात आहे. यासाठी वायुसेनेची अवजड वाहतूक करणारी चिनूक हेलिकॉप्टर्स सातत्याने उड्डाण करीत आहेत. याच्या बरोबरीने अपाचे हेलिकॉप्टर्स देखील या पहाडी क्षेत्रात गस्त घालून चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवत आहेत. भारत आणि चीनचे रणगाडे एकमेकांच्या जवळ येऊन ठेपलेले असताना, अपाचे हेलिकॉप्टर्सची इथली उपस्थिती ही फार मोठी घटना ठरते, असे दावे भारतीय अधिकारी करीत आहेत

वायुसेनेची ‘सी-१७ ग्लोबमास्टर’, ‘आयएल-७६’, ‘सी-१३०जे हर्क्युलिस’ ही अवजड वाहतूक करणारी विमाने व अवजड वाहतूक करणार्‍या चिनूक हेलिकॉप्टर्समुळे जवानांची तैनाती, आवश्यक साहित्यांची ने-आण अतिशय सुलभतेने होत आहे, याकडेही अधिकारी लक्ष वेधत आहेत. यामुळेच लडाखच्या ‘एलएसी’वरील भारतीय सैन्याची स्थिती चीनच्या तुलनेत अतिशय मजबूत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता काहीही झाले तरी चीन भारतीय सैन्याला इथून माघार घेण्यास भाग पाडू शकणार नाही. त्याचवेळी लडाखच्या कडक हिवाळ्याचाही भारतीय सैन्याच्या तैनातीवर परिणाम होऊ शकणार नाही, असा आत्मविश्वास लष्करी अधिकारी व विश्लेषक व्यक्त करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला भारताला आव्हान देऊ पाहणार्‍या चीनच्या लष्कराची अवस्था मात्र बिकट बनलेली आहे.

लडाखच्या क्षेत्रातील प्रतिकुल परिस्थितीत तग धरुन राहणे चिनी जवानांसाठी अवघड बनले आहे. अशा स्थितीत चीनचा निकटतम मित्रदेश असलेल्या पाकिस्तानचे लष्कर मदतीसाठी धावल्याचे वृत्त आहे. चिनी जवानांना पाकिस्तानी लष्कराकडून आपल्या अनुभव कौशल्याचा क्लास दिला जात आहे. या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यामुळे पाकिस्तानसारख्या देशाच्या लष्कराकडून प्रशिक्षण घ्याव्या लागलेल्या चिनी लष्कराची अव्यावसायिकता जगासमोर आली आहे. मोठमोठे दावे ठोकणार्‍या व बढाया मारणार्‍या चीनच्या लष्कराला लडाखच्या क्षेत्रात लढणे तर सोडाच, भारतीय सैन्यासमोर उभे राहणेही जमत नाही, हा संदेश यामुळे जगभरात गेला आहे.

leave a reply