अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताच्या विरोधात वापर होऊ देणार नाही 

- अफगाणिस्तानचे सीईओ अब्दुलाह अब्दुलाह यांची ग्वाही 

नवी दिल्ली – ‘भारताला लोकशाहीवादी अफगाणिस्तान हवा आहे. जिथे दहशतवाद्यांना थारा नसेल’, अशा शब्दात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भारतभेटीवर आलेल्या अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अब्दुलाह अब्दुलाह यांच्याकडे भारताची भूमिका मांडली. यावेळी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात होऊ देणार नाही, अशी ग्वाही अब्दुलाह यांनी दिली. तसेच गुरुवारी अब्दुलाह अब्दुलाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली, यावेळी पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या शांतीचर्चेला भारताचा कायम पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले.

भारताच्या विरोधात

पाच दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या अब्दुलाह अब्दुलाह यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली. यावेळी अफगाणिस्तानमधील घडामोडींचा, अफगाण- तालिबान शांतीप्रक्रियेचा मुद्दाही चर्चेत होता. अफगाणिस्तानच्या शांतीचर्चेला भारताचे समर्थन असल्याने डोवल यांनी यावेळी म्हटले. यावेळी दहशतवाद्याचा मुद्दा अग्रस्थानी होता. भारताला असा लोकशाहीवादी अफगाणिस्तान हवा आहे, जिथे दहशतवादाला थारा असता कामा नये, असे डोवल यांनी स्पष्ट केले.

याआधी अफगाणिस्तान तालिबान शांतीचर्चेच्या उद्दघाटन समारोहादरम्यान व्हर्च्युअल उपस्थित असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होता कामा नये, असा इशारा दिला होता. डोवाल यांच्या भेटीनंतर अब्दुलाह अब्दुलाह यांनी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि परराष्ट्रसचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी ही चर्चा केली.  गुरुवारी सकाळी अब्दुलाह अब्दुलाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणानुसार भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

यावेळी उभय देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा पार पडली. त्यानंतर अब्दुलाह अब्दुलाह यांनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तान शांती प्रक्रिया आणि कतारमध्ये सुरु असलेल्या शांतीचर्चेच्या घडामोडींची माहिती दिली. अफगाणिस्तानच्या शांतीचर्चेला भारताचा पाठिंबा असेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी अब्दुलाह अब्दुलाह यांना आश्वस्त केले.  तसेच कायमस्वरूपी संघर्षबंदीचे भारताकडून स्वागत असेल, असे पंतप्रधानांनी आवुर्जन म्हटले. अब्दुलाह अब्दुलाह अफगाणिस्तानच्या सरकारच्या वतीने शांतीचर्चेचे नेतृत्व करीत आहेत.

 दरम्यान,अब्दुलाह अब्दुलाह  गुरुवारी सांयकाळी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी भारत अफगाणिस्तानचा कायम मित्र आहे आणि भारताने दाखवलेल्या औदार्याचा अफगाणिस्तान ऋणी आहे, असे विधान अब्दुलाह अब्दुलाह यांनी केले. तसेच अफगाणिस्तानचे छाबहार बंदर मध्य आणि दक्षिण आशियाई देशांसाठी मोठी संधी असल्याचे अब्दुलाह अब्दुलाह म्हणाले. भारतामध्ये छाबहार बंदराचा विकास करीत असल्याचे सांगून अब्दुलाह अब्दुलाह यांनी समाधान व्यक्त केले. तसेच युद्धात कोणी विजयी नसतो. तसेच शांततापूर्ण वाटाघाटींमध्ये कोणी पराभूत होत नाही, याची आठवण अब्दुलाह अब्दुलाह यांनी करुन दिली.

leave a reply