नाटोच्या नव्या धोरणात सायबरसुरक्षा व दहशतवादासह चीनचाही समावेश होणार

- नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग

ब्रातिस्लावा – गेल्या दशकात नाटोने आखलेले धोरण आता बदलण्याची गरज असून, नव्या धोरणात सायबरसुरक्षा व दहशतवादासह चीनचाही समावेश करणे आवश्यक आहे, असे आवाहन नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केले. स्टॉल्टनबर्ग यांनी गेल्या महिन्यातही एका कार्यक्रमादरम्यान चीनच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून चीनविरोधात नाटो सक्रिय होईल, असे संकेत दिले होते. युरोपमधील अभ्यासगटाने आयोजित केलेल्या बैठकीत, नाटोचा सदस्य देश असणाऱ्या कॅनडानेही, साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांवर नाटोने नीट लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे.

नाटोच्या नव्या धोरणात सायबरसुरक्षा व दहशतवादासह चीनचाही समावेश होणार - नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्गस्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हामध्ये ‘ग्लोबसेक’ या अभ्यासगटाने बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीदरम्यान नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी, गेल्या वर्षी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देऊन नाटोचे धोरण बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत दिले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी, नाटो आघाडी ‘ब्रेन डेड’ झाल्याची टीका केली होती. ‘फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाटोने आपले धोरण बद्दलण्यासाठीची प्रकिया सुरू केली आहे. नाटो आपल्या आगामी धोरणात मोठे बदल करणार आहे. जगभरात मूलभूत संकल्पना वेगाने बदलत आहेत, त्यामुळे आता नाटोच्या नव्या धोरणासाठीही संकल्पना विकसित करण्याची वेळ आली आहे’, या शब्दात स्टॉल्टनबर्ग यांनी नाटो नव्या आव्हानांवर अधिक भर देईल, असे स्पष्ट संकेत दिले.

नाटोच्या नव्या धोरणात सायबरसुरक्षा व दहशतवादासह चीनचाही समावेश होणार - नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्गनाटोच्या नव्या धोरणाचा उल्लेख ‘नाटो २०३०’ असा करताना त्यात चीन, सायबरसुरक्षा व दहशतवाद यांचा समावेश असेल, असे नाटोप्रमुखांनी सांगितले. ‘चीनच्या उदयाने जागतिक सत्तास्पर्धेचा समतोल बदलू लागला असून याची दखल घेणे नाटोला भाग आहे’, असे स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी सायबर तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने तसेच आखाती देश व आफ्रिकेतील वाढत्या दहशतवादी कारवायांचाही उल्लेख केला. नाटोप्रमुखांनी संघटनेसमोर असलेल्या आव्हानांचा उल्लेख करताना चीनचा उल्लेख करण्याची महिनाभरातील ही दुसरी वेळ ठरते. गेल्या महिन्यात, ‘सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी ॲनॅलिसिस’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, नाटोप्रमुखांनी, चीनविरोधात नाटो आघाडी निर्णायक ठरू शकते, याची जाणीव करून दिली होती. त्याचवेळी चीनचा धोका रोखण्यासाठी नाटोचा विस्तार करण्याची आवश्यकता असून युरोपव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील समविचारी देशांशी सहकार्य वाढविणे महत्त्वाचे ठरेल, याकडे नाटोप्रमुखांनी लक्ष वेधले होते.

नाटोच्या नव्या धोरणात सायबरसुरक्षा व दहशतवादासह चीनचाही समावेश होणार - नाटोप्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्गदरम्यान, नाटोच्या सदस्य देशांकडूनही चीनच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात झाल्याचे ब्रातिस्लाव्हामधील बैठकीत दिसून आले. नाटोतील आघाडीचा देश असणाऱ्या कॅनडाने, साऊथ चायना सीमधील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. साऊथ चायना सीमधील चीनच्या हालचाली सुरक्षेच्या दृष्टीने आव्हान असून त्यावर नाटोकडून लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजित सज्जन यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच कॅनडाने साऊथ चायना सीमध्ये आपली युद्धनौका पाठविल्याचेही समोर आले होते.

leave a reply