भारत-भूतान सीमेजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त – चिनी बनावटीची शस्त्रे आढळली

कोक्राझार – भारत-भूतान सीमेजवळील आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील जंगलात पोलिसांनी केलेल्या कारवाईत शस्त्रास्त्रे व दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चिनी बनावटीच्या शस्त्रांचाही समावेश असल्याने ही घटना सुरक्षादलांची चिंता वाढविणारी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ‘बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट’च्या (बीटीएडी) भागात सुरक्षा दलाने अशाच प्रकारची कारवाई करीत शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केला होता. नव्या कारवाईमुळे ईशान्य भारतातल्या दहशतवादी संघटनांना चीनकडून सहाय्य मिळत असल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळत आहे.

भारत-भूतान सीमेजवळील आसामच्या कतलीबील आणि बेलगुरी जंगल क्षेत्रात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी दुपारच्या सुमारास शोध मोहीम हाती घेतली.  या कारवाईत मशीनगन, पाच एके-५६ रायफल्स, २४४ काडतुसे, इन्सास रायफल, ९ एमएमच्या तीन पिस्तुलांसह पाच मॅगझिन्स, पॉईंट २२ चायनीज गनसह  दोन मॅगझिन्स, काडतुसे आणि हॅण्ड ग्रेनेड असा शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईमुळे मोठा हल्ल्याचा कट उधळला गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

गेल्या महिन्याभरापासून ‘बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट’च्या भागात दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे या भागात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. ‘बीटीएडी’च्या चार जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. रविवारी कतलीबील व बेलगुरी जंगलात सापडलेला शस्त्रसाठा ही महिन्याभरातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते. बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलच्या (बीटीसी) निवडणुका एप्रिलमध्ये होणार होत्या. पण कोरोना साथीमुळे पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका होऊ नये म्हणून ‘बीटीएडी’च्या भागात दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ईशान्य भारतात कारवाया करणाऱ्या बहुतांश दहशतवादी संघटनांना चीनकडून सहाय्य मिळत असल्याचे यापूर्वी करण्यात आलेल्या कारवायांवरून स्पष्ट झाले होते. आता चीनकडून पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रांची व्याप्ती भूतान सीमेपर्यंत पोहोचल्याने सुरक्षा दलांसमोरील चिंता अधिकच वाढल्याचे दिसत आहे. भूतानमध्ये घुसखोरी करण्याचे व त्याच्यावर दडपण आणण्याचे चीनचे प्रयत्न भारताने सातत्याने उधळून लावले आहेत. त्यामुळे आता चीन शस्त्रांच्या माध्यमातून भूतान सीमेवर गडबडी माजविण्याच्या हालचाली करीत असल्याचे संकेत आसाम पोलिसांनी केलेल्या कारवाईतून मिळत आहेत.

leave a reply