अफगाणिस्तानच्या लष्कराचा ड्युंरड लाईनजवळील सरावातून पाकिस्तानला इशारा

काबूल – अफगाणिस्तानच्या लष्कराने ड्युरंड लाईनजवळील ’स्पिन बोल्दाक’ भागात लष्करी सराव करुन पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात पाकिस्तानी लष्कराने हल्ला चढवून १५ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे याच भागात लष्करी सराव आयोजित करुन अफगाणी लष्कराने शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास आपण सज्ज असल्याची घोषणा अफगाणिस्तानच्या लष्कराने केली आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या लष्कराने ड्युरंड लाईनजवळील गोश्त आणि नांगरहार प्रांतात लष्करी सराव केला होता. अफगाणी लष्कराच्या सीमेजवळील या वाढत्या हालचाली पाकिस्तानच्या चिंतेत भर टाकणाऱ्या ठरतात.

अफगाणिस्तानच्या लष्कराचा ड्युंरड लाईनजवळील सरावातून पाकिस्तानला इशारारविवारी अफगाणिस्तानच्या लष्कराने ड्युरंड लाईनजवळील कंदहारमध्ये रणगाडे, हेलिकॉप्टर्स, अवजड आणि हलक्या वजनाच्या शस्त्रास्त्रांसह लष्करी सराव केला. गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणी लष्कराने आयोजित केलेला हा सर्वात मोठा युद्धसराव ठरतो. यावेळी अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल यासिन झिया उपस्थित होते. अफगाणिस्तानच्या जनतेला असलेल्या धोक्याला प्रयुत्तर देण्यासाठी अफगाणी लष्कर सज्ज आहे, असा इशारा जनरल झिया यांनी यावेळी दिला. अफगाणिस्तानच्या लष्करप्रमुखांनी उघड उल्लेख केला नसला तरी ड्युरंड लाईनजवळ घुसखोरी करून चौक्या उभारणार्‍या पाकिस्तानवर त्यांनी निशाणा साधल्याचे उघड आहे.

या सरावात सहभागी झालेले जवान आणि हा सराव पाहण्यासाठी जमा झालेल्या स्थानिकांनीही यावेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अफगाणी लष्कर कधीही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. याआधीही अफगाणी लष्कराने पाकिस्तानला धडा शिकविला आहे, याची आठवण या सरावात सहभागी झालेल्या अफगाणिस्तानच्या जवानाने करुन दिली. पाकिस्तानने दहा वेळा अफगाणी लष्कराचा पराभव केला तर आम्ही त्यांचा १०० वेळा पराभव करु. अफगाणिस्तानच्या फोर्समध्ये लायन्स आहेत, अशा कडक शब्दात दुसर्‍या जवानाने पाकिस्तानला ठणकावले. तर अफगाणिस्तानचे लष्कर पाकिस्तानशी थेट भिडू शकतात, असे सांगून स्थानिकांनी यावेळी अफगाणी लष्करावरचा विश्वास व्यक्त केला.

अफगाणिस्तानच्या लष्कराचा ड्युंरड लाईनजवळील सरावातून पाकिस्तानला इशाराकाही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमाभागात रॉकेट्‍स आणि तोफगोळ्यांचे हल्ले चढवून १५ जणांचा बळी घेतला होता. तेव्हा अफगाणिस्तानने लष्कर आणि हवाईदलाला प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा तणाव वाढला होता. दरम्यान, ड्युंरड लाईनवरुन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये फार जूना वाद आहे. पाकिस्तान दावा करीत असलेली ड्युरंड लाईन अफगाणिस्तानला अजिबात मान्य नाही. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराकडून या भागात उभारले जाणारे कुंपण किंवा लष्करी चौक्यांना अफगाणिस्तानकडून जोरदार विरोध केला जातो. यावरुन दोन्ही देशांमध्ये नेहमीच संघर्ष पेटत असतो. अशा परिस्थितीत या ड्युरंड लाईनजवळ अफगाणिस्तानच्या लष्कराने तीन दिवसात दोनवेळा लष्करी सराव करुन पाकिस्तानला इशारा दिला.

leave a reply