भविष्यातील युद्धभूमी लेझरमुळे बदलून जाईल

-इस्रायलच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी

तेल अविव – ‘येत्या काळात आपण युद्धभूमीवर लेझरचा अधिकाधिक वापर पाहणार आहोत. बचावासाठी आणि संरक्षणासाठी, जमिनीवर तसेच हवेतही या लेझरचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यातील युद्धभूमीच बदलून टाकील’, असा इशारा इस्रायलच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल अमिकम नर्कीन यांनी दिला. जगभरात सध्या हवाईदलांचे महत्त्व वाढत असून येत्या काळात इस्रायलच्या हवाईदलालाही अनेक मोहिमा पार पाडायच्या आहेत, असे संकेत मेजर जनरल नर्कीन यांनी दिले.

युद्धभूमी‘२०२२ कॅल्कालिस्ट अँड बँक हॅपोलिम फोरकास्ट्स कॉन्फरन्स’मध्ये बोलताना इस्रायली हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकारी नर्कीन यांनी इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील नव्या आव्हानांकडे लक्ष वेधले. ‘पुढील दशकभरात, सुरक्षेच्या दृष्टीने इस्रायलचे लष्कर आणि हवाईदल अतिशय प्रभावशाली घटक ठरतील’, असे सांगून मेजर जनरल नर्कीन यांनी इस्रायली हवाईदलाचे महत्त्व अधोरेखित केले.

युद्धभूमी बदलू लागली आहे. यापुढे युद्धभूमीवर झेंडा फडकावून विजय मिळविण्यासारखी परिस्थिती पुढच्या काळात नसेल. या काळातील संघर्ष अधिकाधिक गुंतागुंतीचा होणार आहे. अशा परिस्थितीत इस्रायलच्या हवाईदलाला महत्त्वाच्या मोहिमा पार पाडाव्या लागतील, असे नर्कीन म्हणाले. इस्रायली हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी थेट उल्लेख केला नसला तरी ते इराणवरील हल्ल्याबाबत बोलत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर मेजर जनरल नर्कीन यांनी अंतराळ क्षेत्रातील सामर्थ्य वाढविण्याकडे इस्रायलने लक्ष पुरविण्याची आवश्यकता असल्याचे नर्कीन म्हणाले.

युद्धभूमी‘शत्रूदेशात खोलवर असलेल्या लक्ष्यावर कसा हल्ला करायचा, अचूकता कशी साधायची, हे आपल्याला ठाऊक आहे. पण यापुढे इस्रायलला याहून अधिक उंची गाठावी लागेल. सध्या आपण उपग्रहांद्वारे संपर्क करतो, गोपनीय माहिती मिळवतो आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करतो. पण अंतराळ क्षेत्रातील घडामोडींकडेही इस्रायलने अधिक लक्ष केंद्रीत करायला हवे, असा मेजर जनरल नर्कीन यांनी दिला.

गेल्या काही वर्षांपासून इस्रायलचे लष्कर लेझर यंत्रणेवर काम करीत आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रायलच्या हवाईदलाने विमानात लेझर बसवून ड्रोन भेदल्याची बातमी समोर आली होती. तर गाझातून होणार्‍या रॉकेट हल्ल्यांविरोधात यशस्वी ठरलेल्या ‘आयर्न डोम’ची पुढील प्रगत आवृत्ती लेझर डोम असेल, असेही बोलले जाते. मेजर जनरल नर्कीन यांनी याचे संकेत दिले आहेत.

leave a reply