आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ

- गोल्ड रिझर्व्हज् तीन दशकांमधील सर्वोच्च स्तरावर

टोकिओ/वॉशिंग्टन  – जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरचे घटणारे मूल्य, वाढती महागाई व कोरोनाचे संकट या पार्श्‍वभूमीवर जगातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढविली आहे. या वर्षात जगातील विविध मध्यवर्ती बँकांनी आपल्या राखीव साठ्यांमध्ये ४०० टनांहून अधिक सोन्याची भर टाकली. यात थायलंड, भारत, ब्राझिल, सिंगापूर, उझबेकिस्तान व हंगेरी यासारख्या देशांचा समावेश आहे. थायलंडच्या मध्यवर्ती बँकेने या वर्षात ९० टन सोने खरेदी केले. मध्यवर्ती बँकांकडील सोन्याचा राखीव साठा ३६ हजार टनांवर जाऊन पोहोचला असून हा १९९० सालानंतरचा नवा विक्रम ठरला आहे.

सोन्याच्या खरेदीतआंतरराष्ट्रीय नाणेनिधी व ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिलेल्या माहितीतून सोन्याच्या खरेदीचा कल वाढल्याचे दिसते. सोन्याच्या वाढत्या खरेदीमागे अमेरिकी डॉलरचे घसरणारे मूल्य, जगभरात वेगाने वाढलेली महागाई आणि कोरोनाची साथ, ही प्रमुख कारणे ठरली आहेत. ‘जागतिक अर्थव्यवस्थेतील नवे धोके तसेच वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सोने ही सुरक्षित गुंतवणूक तसेच तारण म्हणून वापरण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो’, या शब्दात हंगेरीच्या मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखांनी सोन्याच्या खरेदीमागील भूमिका स्पष्ट केली. हंगेरीने यावर्षी ६३ टन सोने खरेदी केले आहे.

थायलंडच्या मध्यवर्ती बँकेने यावर्षी ९० टन सोने खरेदी केले असून भारताने आपल्या सोन्याच्या राखीव साठ्यात ७१ टनांची भर टाकली आहे. ब्राझिलने ६० टन, उझबेकिस्तानने ५० टनांहून अधिक तर सिंगापूरने २६ टन सोने खरेदी केले. कझाकस्तान, रशिया, आयर्लंड, पोलंड यासारख्या देशांनीही सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. पोलंडने येत्या काही वर्षात सोन्याच्या साठ्यांमध्ये १०० टनांची भर टाकण्याची घोषणा केली आहे. तर आयर्लंडने २००९ सालानंतर प्रथमच सोन्याच्या साठ्यात भर टाकल्याचे जाहीर केले. रशियाने यावर्षी सहा टनांहून अधिक सोने खरेदी केल्याची माहिती दिली आहे.

सोन्याच्या खरेदीतगेल्या दशकभरात जगातील विविध मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या राखीव साठ्यात तब्बल साडेचार हजार टनांची भर टाकली आहे. २००८-०९ साली आलेल्या मंदीने सोन्याच्या साठ्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रक्रियेला गती दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकी डॉलरबाबतची अनिश्‍चितता वाढू लागली असून चीन, रशिया तसेच युरोपिय देशांकडून त्याचा वापर घटू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्यावर असलेला विश्‍वास वाढत असून मध्यवर्ती बँकांची वाढती खरेदी त्याला दुजोरा देणारी ठरते.

leave a reply