लेझरची भिंत इस्रायलचे संरक्षण करील

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

लेझरची भिंततेल अविव – हमास आणि इतर दहशतवादी संघटनांच्या रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या हल्ल्यांपासून लेझरची भिंत इस्रायलची सुरक्षा करील, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केली. येत्या वर्षभरात इस्रायलच्या संरक्षणदलात ही लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात होईल, असे पंतप्रधान बेनेट यांनी जाहीर केले. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर युएईवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले वाढवित असताना, इस्रायलच्या पंतप्रधानांची ही घोषणा लक्षवेधी ठरते.

‘इन्स्टिट्युट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडिज्-आयएनएसएस’ने आयोजित केलेल्या सुरक्षाविषयक आंतरराष्ट्रीय बैठकीत बोलताना, पंतप्रधान बेनेट यांनी इस्रायलच्या सुरक्षेला असलेला धोका व त्यावरील उपाय यांची माहिती दिली. यावेळी इस्रायलच्या पंतप्रधानांनी लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तैनातीची घोषणा केली. इस्रायलच्या भोवती या लेझर भिंतीचे सुरक्षा कवच उभारले जाणार असल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी जाहीर केले. यामुळे आर्थिक गणिते बदलतील, असा दावा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला.

गेल्या वर्षी हमासने इस्रायलवर सलग १३ दिवस जवळपास ४,५०० रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. इस्रायलच्या आयर्न डोमने हमासचे बहुतांश रॉकेट हल्ले उधळले होते. पण इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर याचा ताण आला होता. कारण या आयर्न डोममध्ये इंटरसेप्टर म्हणून वापरल्या जाणार्‍या एका तामिर क्षेपणास्त्राची किंमत ८० हजार डॉलर्स इतकी आहे.

लेझरची भिंतत्यामुळे आयर्न डोमचा वापर इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढविणारा ठरला होता. मात्र लेझर यंत्रणेच्या वापरामुळे हा खर्च कमी होणार असल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेनेट करीत आहेत. म्हणूनच लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तैनातीची घोषणा करताना, इस्रायलच्या पंतप्रधानांनी सदर यंत्रणेच्या तैनातीमुळे आर्थिक ताण कमी होईल, असा दावा केला.

गेल्या काही वर्षांपासून इस्रायल लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेवर काम करीत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण सदर यंत्रणा तैनात होण्यासाठी २०२५ साल उजाडेल, असे माजी इस्रायली लष्करी अधिकारी व लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे होते. पंतप्रधान बेनेट यांनी यासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार नाही, असे सांगून वर्षभरात या लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी व त्यानंतर तैनाती सुरू होईल, अशी माहिती दिली.

लेझरची भिंतगाझापट्टीतून हमासच्या रॉकेट हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन, दक्षिण इस्रायलपासून या लेझर यंत्रणेच्या तैनातीची सुरुवात होईल, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले. हमास किंवा हिजबुल्लाहच्या रॉकेट व क्षेपणास्त्र हल्ल्यांना भेदण्यासाठी इस्रायलने ‘थ्री लेअर’ हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. यामध्ये लघु पल्ल्याच्या रॉकेट्ससाठी ‘आयर्न डोम’, मध्यम-लांब पल्ल्याच्या रॉकेट्स व क्षेपणास्त्रांसाठी ‘डेव्हिड्स स्लिंग’ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी ‘ऍरो’ या यंत्रणांचा समावेश होतो. पण या लेझर यंत्रणेमुळे इस्रायलच्या हवाई सुरक्षेचे कडे अधिक मजबूत होणार असल्याचा दावा केला जातो.

गाझापट्टीतील हमास तसेच लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर शेकडो रॉकेट्सचे हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत, इस्रायलची ही नवी हवाई सुरक्षा यंत्रणा या दहशतवादी संघटनांसाठी उत्तर ठरते. त्याचबरोबर, इस्रायली सीमेच्या सुरक्षेसाठी या लेझर यंत्रणेची तैनाती केल्यानंतर इतर देशांना याचे तंत्रज्ञान विकण्याचे संकेत पंतप्रधान बेनेट यांनी दिले आहे. नव्या पिढीची ही इस्रायली हवाई सुरक्षा यंत्रणा या क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांना पुरविण्यासाठी इस्रायल तयार असल्याचे पंतप्रधान बेनेट म्हणाले.

दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाईदलांनी भूमध्य समुद्रात सरावाचे आयोजन केले होते. यात इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ले चढविण्याची प्रात्यक्षिके सादर केली. अमेरिकन अधिकार्‍यांच्या देखरेखीत हा सराव पार पडल्याचे, इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्रायलचा हा सराव इराणसाठी इशारा ठरतो.

leave a reply