युएई, सौदीवरील हौथींच्या हल्ल्यांना बायडेन प्रशासन जबाबदार

- अमेरिकी अभ्यासगटाचा आरोप

बायडेन प्रशासनवॉशिंग्टन – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाची धोरणे येमेनमधील हौथी बंडखोरांना युएई आणि सौदी अरेबियाच्या राजधानीवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, असा गंभीर आरोप अमेरिकेच्या प्रसिद्ध अभ्यासगटाने केला. गेल्या वर्षभरात बायडेन प्रशासनाने इराणशी जुळवून घेण्याच्या भूमिकेमुळे अमेरिका अरब देशांचा विश्‍वास गमावत आहे. इराणसंलग्न या हौथी बंडखोरांची वाढती आक्रमकता फक्त युएई व सौदीसाठीच नाही तर अमेरिकेच्या सुरक्षेसाठी देखील धोकादायक ठरेल, असा इशारा या अभ्यासगटाने दिला.

येमेनमधील हौथी बंडखोरांनी गेल्या दहा दिवसांमध्ये दोन वेळा युएईची राजधानी अबू धाबीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सचे हल्ले चढविले. त्याचबरोबर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग दुबईच्या भेटीवर असतानाही हौथी बंडखोरांनी या शहराच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले होते. युएईने हौथींचा हा हल्ला उधळला होता. हौथी बंडखोरांनी युएईवर सुरू केलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका लवकरच विनाशिका आणि प्रगत लढाऊ विमाने रवाना करणार आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला. मात्र याआधी हौथी बंडखोरांबाबत स्वीकारलेल्या धोरणामुळे बायडेन प्रशासनावर यासंदर्भात गंभीर आरोप होत आहेत.

बायडेन प्रशासनकाही महिन्यांपूर्वी बायडेन प्रशासनाने याच इराणसंलग्न हौथी बंडखोरांना ‘टेरर लिस्ट’मधून काढले होते. सौदी अरेबिया, युएई व इतर अरब देशांनी केलेल्या आवाहनाची पर्वा केली नव्हती. गेल्या महिन्याभरात हौथी बंडखोरांनी अबू धाबीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्यानंतर युएईने अमेरिकेकडे या संघटनेला दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्याची पुन्हा मागणी केली होती. पण अजूनही बायडेन प्रशासनाने यावर कारवाई केलेली नाही. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे हौथी बंडखोरांचा जोर वाढला असून ते सौदी व युएईवरील हल्ले अधिकच तीव्र करीत असल्याची टीका आखाती देशांमधील विश्‍लेषक तसेच पत्रकारांनी केली होती.

गेल्या वर्षी बायडेन प्रशासनाने हौथींना दहशतवादी यादीतून वगळण्याबरोबरच सौदी व युएईमध्ये आधीपासून तैनात अमेरिकेचे जवान व हवाई सुरक्षा यंत्रणा माघारी घेण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर सौदी व युएईचे शस्त्रसहाय्य देखील रोखले. याचा फायदा घेऊन हौथींनी या दोन्ही देशांवरील ड्रोन्स, रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले वाढविले आहेत. हे हल्ले भेदण्यासाठी सौदी व युएई हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर करीत असून येत्या काळात या दोन्ही देशांकडील इंटरसेप्टर्सचा साठा संपुष्टात येण्याचा दावा आखाती माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगट ‘गेट्सटन इन्स्टिट्यूट’ने आखाती माध्यमे, विश्‍लेषक व पत्रकारांचा हवाला देऊन बायडेन प्रशासनावर टीका केली आहे. त्याचबरोबर युएईवरील हल्ल्यानंतर ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’ने व्यक्त केलेल्या नाराजीचा उल्लेख या अभ्यासगटाने केला आहे. बायडेन प्रशासन हौथी बंडखोरांबाबत दाखवित असलेल्या नरमाईमुळे अमेरिका अरब देशांचा विश्‍वास गमावत आहे. बायडेन प्रशासनाने यापुढेही इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे समर्थन सुरू ठेवले तर अरब देशांच्याच नाही तर अमेरिकेच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होईल. यासाठी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा या अभ्यासगटाने दिला आहे.

leave a reply