अमेरिकेच्या कॅपिटल हिलमधील हिंसेमागे डाव्या विचारसरणीच्या निदर्शकांचा हात

- रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांचे मत

वॉशिंग्टन – अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील ‘कॅपिटल हिल’वर झालेल्या हिंसाचारामागे डाव्या विचारसरणीच्या निदर्शकांचा हात असल्याचे मत रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांनी नोंदविले. अमेरिकेतील आघाडीची सर्वेक्षण संस्था ‘यु गव्ह’ व याहु कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी हा हिंसाचार घडविला, असे रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या कॅपिटल हिलमधील हिंसेमागे डाव्या विचारसरणीच्या निदर्शकांचा हात - रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांचे मत6 जानेवारी रोजी अमेरिकी संसदेचे सत्र सुरू असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेवर धडक मारली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकार्‍यासह पाच जणांचा बळी गेला होता. ही अमेरिकेसाठी मानहानीकारक घटना असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमे व सोशल मीडियातून उमटली होती. या हिंसाचारावरून ट्रम्प यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. मात्र तो संमत होऊ शकला नाही.

त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व डेमोक्रॅट पार्टीने 6 जानेवारीच्या हिंसाचाराच्या घटनेवरून ट्रम्प यांची चौकशी सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, ‘यु गव्ह’- याहुने केलेले सर्वेक्षण लक्ष वेधून घेणारे ठरते. गेल्या आठवड्यात दीड हजारांहून अधिक जणांशी संपर्क साधून हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती संस्थेने दिली आहे. यात जवळपास 52 टक्के रिपब्लिकन्सनी जानेवारीतील हिंसाचारासाठी ट्रम्प जबाबदार नाहीत, असे मत नोंदविले आहे.

अमेरिकेच्या कॅपिटल हिलमधील हिंसेमागे डाव्या विचारसरणीच्या निदर्शकांचा हात - रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांचे मतफक्त 41 टक्के रिपब्लिकन समर्थकांनी हिंसाचारासाठी ट्रम्प समर्थक जबाबदार असू शकतात, अशी शक्यता वर्तविली. कॅपिटल हिलवर झालेला हिंसाचार योग्य नव्हता असे मत नोंदविणार्‍यांची संख्या 60 टक्क्यांच्या खाली घसरली आहे. तर याप्रकरणी स्वतंत्र चौकशी आयोग नेमण्यास 90 टक्के रिपब्लिकन्सनी विरोध दर्शविला आहे. 70 टक्क्यांहून अधिक रिपब्लिकन समर्थकांनी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या निकालात मोठा घोटाळा झाल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘यु गव्ह’- याहुच्या या सर्वेक्षणातून रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांचा प्रभाव व पाठिंबा अजूनही कायम असल्याचे समोर येत आहेत.

दरम्यान, कॅपिटल हिल हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. सिनेटमध्ये झालेल्या मतदानात सदर प्रस्ताव आवश्यक असलेली 60 मते मिळविण्यात अपयशी ठरला. त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाच्या 30हून अधिक सिनेटर्सनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केल्याचे समोर आले आहे.

leave a reply