सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार

- माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

नवी दिल्ली – सोशल मीडियावरून अपप्रचार व विद्वेष पसरविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशविरोधी अपप्रचार व विद्वेष पसरविण्यासाठी सोशल मीडियावर काहीजण सक्रीय असल्याचे उघडझाले होते व यातील काही अकाऊंट्‌‍स पाकिस्तानातील असल्याची बाबही भारतीय माध्यमांनी निदर्शनास आणून दिली होती.

सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार - माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखरपाकिस्तान व चीन या देशांनी भारताच्या विरोधात प्रचारयुद्ध छेडल्याचे उघडझाले आहे. यानुसार दोन्ही देश भारताच्या विरोधात विपर्यास्त व खोडसाळ माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचेही उघडझाले आहे. या प्रचाराला उत्तर देण्याबरोबरच या देशविरोधी कारवाया रोखणे अत्यावश्‍यक असल्याची जाणीव सुरक्षा तसेच तपासयंत्रणांना झाली होती. अपप्रचाराचा वापर करून सामाजिक तेढ व विद्वेष वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोशल मीडियावरील काहीजणांची अकाऊंटस्‌‍ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून भारताच्या विरोधात विद्वेष माजविणाऱ्या आणि अपप्रचार करणाऱ्या सुमारे 78 अकाऊंट होल्डर्सची यादी सरकारने तयार केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी देखील लवकरच ही कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, 2020 साली लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतर, चीनने खोटीनाटी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी भारताच्या सोशल मीडियाचा वापर केला होता. चीनमध्ये सोशल मीडियाच्या क्षेत्रातील परदेशी कंपन्यांवर बंदी आहे. मात्र इतर देशांमध्ये सोशल मीडियाला असलेल्या स्वातंत्र्याचा चीन आपल्या स्वार्थासाठी वापर करीत असल्याची बाब यामुळे समोर आली होती. याद्वारे चीन भारताच्या विरोधात प्रचारयुद्धच छेडत असल्याचे उघडझाले होते. पाकिस्तानही भारताच्या विरोधात विद्वेषी प्रचार आणि तेढ माजविणारी खोटी माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे समोर आले होते.

leave a reply