लॉकडाऊन ३१ मे पर्यंत कायम राहणार

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९५ हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई, (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या तीन हजाराजवळ, तर एकूण रुग्णांची संख्या ९५ हजारांवर पोहोचली आहे. रविवारी महाराष्ट्रात या साथीमुळे ६३ जणांचा बळी गेला. तसेच दिवसभरात २,३४७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकट्या महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी मुंबईत ३८ जणांचा बळी गेला, तर १५७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात आणि मुंबई शहरात चोवीस तासात नव्या रुग्णाच्या नोंदीचा हा उच्चांक आहे. गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने अनुक्रमे १० आणि ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा झाली.

पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मे नंतर लॉकडाऊन सुरु राहील, असे जाहीर केले होते. मात्र लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा किती दिवसाचा असेल याची घोषणा केली नव्हती. रविवारी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे जाहीर केले. त्याआधी काही राज्यांनी आपल्या अखत्यारीत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने राज्यांना कंटेनमेंट, रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करण्याची सूट दिली आहे. आता याबाबतचा निर्णय राज्ये आपल्या पातळीवर घेतील. लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्याचे स्वरूप वेगळे असेल, असे पंतप्रधान म्हणाले होते. केंद्र सरकराने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. 

दोन राज्यांमध्ये बसेस सुरु करण्याचा निर्णय राज्ये परस्पर समन्वयाने घेऊ शकतील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच रेड झोन असलेल्या भागांमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंच्या विक्री आणि वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. रेड झोन भागात सलूनही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियम आणि खेळांची मैदानही सुरु होणार आहेत. मात्र शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर बंदी कायम राहणार आहे. 

हॉटेल्स, रेस्टोरंटही बंदच राहणार आहेत. पण रेस्टोरंटमधील खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. कुरियर आणि पोस्ट सेवाही सुरु होणार आहे. मद्य विक्रीची दुकाने, पान आणि सिगरेटची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर  इंटरटेन्मेन्ट पार्क, चित्रपटगृह, बार और ऑडिटोरियम, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूलवरील बंदी कायम राहणार आहे. 

दरम्यान देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. शनिवार सकाळपासून ते रविवारच्या सकाळपर्यंत देशात या साथीचे तब्बल ४ हजार ९८७ रुग्ण आढळले होते. यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. मात्र रविवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ९५ हजारांजवळ पोहोचल्याचे राज्यांकडून जाहीर झालेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

leave a reply