तालिबानचा हक्कानी गट दुसऱ्या ९/११च्या तयारीत

-अफगाणिस्तानच्या माजी गुप्तचर प्रमुखाचा इशारा

काबुल, (वृत्तसंस्था) – अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर तळ असलेल्या  तालिबानच्या हक्कानी गटाच्या दहशतवाद्यांकडून  अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर ९/११ सारखा भयंकर हल्ला होऊ शकतो, असा इशारा अफगाणिस्तानच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी दिला आहे. यासाठी अल कायदा हक्कानी नेटवर्कला सहाय्य करीत असल्याचे अफगाणिस्तानच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी म्हटले आहे. तसेच हे हल्ले टाळायचे असतील तर, पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क तळावर हल्ले करावे लागतील, असे या माजी अधिकाऱ्याने बजावले आहे.

अफगाणिस्तानच्या ‘नॅशनल डायरेक्ट्रेट ऑफ सिक्युरिटी’चे (एनडीएस) माजी प्रमुख रहमतुल्ला नबिल यांनी सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्कचा भयंकर कट उघड केला. पाकिस्तानच्या वजिरीस्तान भागात असलेल्या  हक्कानी नेटवर्ककडून आजही अल-कायदाला सहाय्य मिळत आहे. तालिबानमध्ये सर्वात प्रभावी गट असलेल्या हक्कानी नेटवर्कला वेळीच रोखले नाही तर दुसरा ९/११चा हल्ला होऊ शकतो. अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरी, अबू मोहम्मद अल मसरी, सैफ उल आदेल, हे दहशतवादी नेते हक्कानी नेटवर्कच्या साथीने या हल्ल्याची योजना तयार करीत आहेत, असा इशारा नबिल यांनी दिला.

या हल्ल्यासाठी पाकिस्तानी नाही, तर परदेशी दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी व त्याचे सहकारी प्रयत्न करीत आहेत. ‘याह्या हक्कानी’ या कटाचा प्रमुख सूत्रधार आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड होऊ नये म्हणून परदेशी दहशतवाद्यांची भरती केली जात असल्याचे नबिल यांनी म्हटले आहे. यासाठी ‘ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट’, ‘अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट’ आणि ‘अल कायदा सेंट्रल’ या संघटनांमधील दहशतवाद्यांची निवड केली जात आहे. तालिबानच नाही तर अल-कायदामध्ये देखील हक्कानी नेटवर्कचा मोठा प्रभाव आहे, अशी माहिती नबिल यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेनच्या मुलावर केलेल्या कारवाईची माहिती नबिल यांनी दिली. अफगाणिस्तानच्या कुर्रम येथील अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ओसामाचा मुलगा ‘हमजा बिन लादेन’ याच्यासह हक्कानी नेटवर्कचा ‘कारी झकिर’ हा सर्वात मोठा दहशतवादी कमांडर मारला गेला होता. कारी झकिर हा हक्कानी नेटवर्कच्या आत्मघातकी पथकाचा प्रमुख होता. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तो ठार झाल्यामुळे  हक्कानी नेटवर्कला जबर हादरा बसला होता. त्यामुळे हमजा बिन लादेन आणि कारी झकीर यांचा सूड घेण्यासाठी हक्कानी नेटवर्कने दुसऱ्या ९/११च्या हल्ल्याची तयारी केल्याचे नबिल यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या अॅबोटाबादमध्ये ओसामाच्या दडलेल्या ठिकाणाहून सापडलेले साहित्य आणि अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात ‘फारुख अली कहतानी’ या दहशतवाद्याला मिळालेला आश्रय,  या सर्वांमागे हक्कानी नेटवर्कच आहे. याचे सर्व पुरावे सुरक्षा यंत्रणांकडे आहेत. त्यामुळे दुसरा ९/११चा हल्ला टाळायचा असेल तर हक्कानी नेटवर्कवर कारवाई करणे अनिवार्य आहे, असे नबिल यांचे म्हणणे आहे.

नबिल यांनी हक्कानी नेटवर्क बाबत दिलेली भयंकर माहिती, पाकिस्तान अजूनही दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला असल्याचे दाखवून देत आहे. काही दिवसांपूर्वीच अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी  तालिबानचे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेला प्रशिक्षण देत असल्याचे दावे केले होते. त्यातील काही जणांना अटक देखील केली होती. आता  हक्कानी नेटवर्क बद्दल अफगाणिस्तानच्या माजी गुप्तचर प्रमुखांना केलेला दावा, अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांची झोप उडविणारा ठरतो आहे. यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी व या कारवाईत पाकिस्तानच्या लाडक्या हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांचाही समावेश असावा, अशी मागणी अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून  अधिक आक्रमकपणे केली जाऊ शकते.

leave a reply