मर्केल यांनी जर्मनीची सत्ता सोडल्यानंतर मॅक्रॉन युरोपिय महासंघाचे ‘सुपरस्टेट’ करतील

- युरोपातील विश्‍लेषकांचा दावा

लंडन- जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल या पुढच्या काही महिन्यात सत्ता सोडतील. या संधीच्या प्रतिक्षेत असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन युरोपिय महासंघावर पूर्ण पकड बसवतील आणि महासंघाचे ‘सुपरस्टेट’ करतील, असा दावा युरोपमधील विश्‍लेषकांनी ब्रिटिश दैनिकाशी बोलताना केला. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची यासंबंधीची धोरणे लोकशाही आणि सार्वभौमत्वाचा पुरस्कार करणार्‍या देशांसाठी ही भयावह घडामोड ठरेल, असा इशाराही या विश्‍लेषकांनी दिला आहे.

युरोपिय महासंघाचे कामकाज आणि व्यवस्था सांभाळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असले तरी महासंघातील मोठी अर्थव्यवस्था असलेले देश म्हणून या संघटनेच्या निर्णयावर चॅन्सेलर मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. यापैकी महासंघाचे वास्तविक नेते म्हणून जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याकडे पाहिले जाते. पण पुढच्या वर्षी मर्केल आपल्या पदावरुन खाली उतरणार आहेत, याची आठवण युरोपमधील काही विश्‍लेषकांनी ब्रिटिश दैनिकाशी बोलताना करून दिली.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन जर्मनीतील याच घडामोडींची प्रतिक्षा करीत आहेत, असा दावा या विश्‍लेषकांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन चॅन्सेलर मर्केल यांची जागा घेण्याच्या प्रयत्नात होते. मर्केल पायउतार झाल्यानंतर महासंघातील सर्वात मोठे नेतृत्व म्हणून मॅक्रॉन या संघटनेवर आपली पकड अधिक घट्ट करतील, असे बेन हॅरिस-क्यूनी, आनंद मेनन आणि वेन ग्रँट या विश्‍लेषकांनी म्हटले आहे. दरम्यान, युरोपिय महासंघाला ‘सुपरस्टेट’ करण्याची योजना महासंघाचे माजी अध्यक्ष जंकर यांनी २०१६ साली मांडली होती. पण ब्रिटन, हंगेरी तसेच पूर्व युरोपिय देशांनी याचा कडाडून विरोध केला होता.

leave a reply