१९९६च्या स्फोटके व शस्त्र तस्करी प्रकरणात दाऊद आणि सालेमचा साथीदार कुट्टीला झारखंडमधून अटक

अहमदाबाद – मुंबई आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी स्फोटके आणि शस्त्रांस्त्रांच्या तस्करी करणार्‍या अब्दुल माजिद कुट्टी या दाऊदच्या फरार हस्तकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या चोवीस वर्षांपासून कुट्टी फरार होता. अखेर रविवारी त्याला झारखंडच्या जमशेदपूरमधून गुजरात एटीएसने अटक केली.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय आणि गँगस्टर दाऊद इब्राहिम याने १९९७ साली पुन्हा एकदा भारतात दहशवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता. २६ जानेवारी १९९७ साली मुंबई आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले घडविण्यात येणार होते. मात्र सुदैवाने या कटाची माहिती पोलिसांना मिळाली आणि गोपनिय माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकत मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

गुजरात पोलिसांनी मेहसानामधून चार कीलो आरडीएक्स, दहा डेटोनेटरर्स, १३० पिस्तूल, ११३ मॅगझिन्स आणि ७५० काडतुसे जप्त केली होती. या प्रकरणात नंतर तीन जणांना अटक करण्यात आली. मुहम्मद फैजल मोहम्मद उस्मान (अजमेर), अनवर कुरेशी (मुंबई) आणि शकिल इब्राहिम कुरेशी (बरेली, उत्तर प्रदेश) अशी या तिघांची नावे होती. मात्र कुट्टी निसटला होता.

या प्रकरणात मेहसाना न्यायालयाने नंतर कुट्टी, दाऊद इब्राहिम आणि आबू सालेम विरोधात अटक आदेश जारी केले होते. दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम १९९३ या बॉमस्फोटांआधीच भारतातून पळून गेले होते. तर कुट्टी हा १९९६ साली भारतातून फारार झाला. गेल्या काही वर्षांपासून तो परदेशात राहत होता. मात्र २०१९मध्ये तो भारतात आला आणि नाव बदलून जमशेदपूरमध्ये राहत होता, अशी माहिती गुजरात पोलिसांनी दिली.

कुट्टी हा मोहम्मद कमाल नावाने गेल्या दीड वर्षांपासून जमशेदपूरमध्ये वास्तव्य करून होता. त्याच्याबद्दल गुजरात एटीएसचे उपाधिक्षक के.के.पटेल यांना खबर्‍यांकडून कुट्टीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुट्टीला गुजरातमध्ये आणण्यात आले असून चौकशीत त्याने १९९७च्या प्रजासत्ताकदिनी रचलेल्या बॉम्बस्फोट कटात आणि शस्त्रतस्करीत आपला हात होता, याची कबूली दिल्याचे गुजरात पोलिसांनी म्हटले आहे.

कुट्टी मुळचा मुंबईतील माहिम येथील असून १९८४ साली तो दुबईला गेला. तेथे एका कंपनीत काही काळ नोकरी केल्यावर तो मुंबईत परताला आणि दाऊद इब्राहिमच्या टोळीत सामील झाला. दाऊद इब्राहिमबरोबर अनिस इब्राहिम, अबू सालेम, मोहम्मद डोसा, मुस्तफा डोसा, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांबरोबर कुट्टी सोने तस्करी करू लागला. १९९३च्या बॉम्बस्फोनंतर दाऊद इब्राहिम आणि सर्व जवळचे साथीदार भारतातून फरार झाले. मात्र कुट्टी भारतातच होता. १९९६ला कुट्टी दुबई गेला होता आणि तेथे अबू सालेम व त्याची भेट झाली. या भेटीतच १९९७च्या प्रजासत्ताक दिनी बॉमस्फोट आणि हल्ले घडविण्याचा कट शिजला.

यासाठी राजस्थानच्या बारमेर येथील पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेतून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात आली. मुहम्मद फैजल मोहम्मद उर्फ पठाणने ही कामगिरी फत्ते पाडल्यावर बारमेरमधून ही स्फोटके आणि शस्त्रसाठा मुंबईला नेण्याची जबाबदारी कुट्टीची होती, अशी माहिती गुजरात पोलिसानी दिली.
हा साठा पकडला गेल्यावर कुट्टी फरार झाला. काही काळ तो बँकॉकमध्ये राहिला. येथे त्याची ओळख जमशेदपूरमधील मोहम्मद इनामशी झाली. त्याच्याच सहाय्याने त्याने मोहम्मद कमाल नावाने बनावट भारतीय पासपोर्ट बनवून पुन्हा सोने तस्करी सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

१९९६च्या या शस्त्रसाठा तस्करी व दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या प्रकरणात अबू सालेमला याआधीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

leave a reply