तालिबानच्या कारवाईत ‘आयएस’चा मोठा नेता ठार

नेता ठारकाबुल – अफगाणिस्तानातील ‘आयएस’च्या नेटवर्कविरोधात तालिबानने मोहीम छेडली आहे. परदेशी दूतावास तसेच अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या धर्मांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ल्यांची योजना आखणारा ‘आयएस’चा वरिष्ठ कमांडर कारी फतेह याला ठार केल्याचे तालिबानने जाहीर केले. या कारवाईसह तालिबानने अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना संदेश दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानची राजवट ताब्यात घेतल्यापासून ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेविरोधात कठोर कारवाई हाती घेतलेली नाही. गेल्या दीड वर्षात आयएसच्या अफगाणिस्तानातील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून तालिबान या दहशतवादी संघटनेला पाठीशी घालत असल्याचा आरोप अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी केला होता. पण गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानने आयएसविरोधात व्यापक मोहीम छेडली आहे.

अफगाणिस्तानातील आयएसचे स्लिपर सेल तसेच प्रशिक्षण तळ आणि छुप्या ठिकाणांवर धाडी टाकून तालिबान आयएसच्या दहशतवाद्यांचा खातमा करीत आहे. गेल्या आठवड्यात तालिबानने राजधानी काबुलमध्ये केलेल्या कारवाईत आयएसचा दहशतवादी ठार केला होता. तर रविवारी तालिबानने कारी फतेह याचा बंदोबस्त केला.

गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानातील परदेशी दूतावास, प्रार्थनास्थळे व इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांचे नेतृत्व कारी फतेहने केले होते. त्यामुळे याला ठार करून तालिबानने आयएसला हादरा दिला आहे. तसेच तालिबान आयएसविरोधात कारवाई करीत नसल्याच्या अमेरिकेच्या आरोपांना उत्तर दिल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply