इराणने युरेनियमचे संवर्धन ८३ टक्क्यांवर नेले आहे

- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचा दावा

युरेनियमचे संवर्धनव्हिएन्ना/बर्लिन – इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक पातळीवर पोहोचल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने केला आहे. इराणने युरेनियमचे संवर्धन ८३.७ टक्क्यांपर्यंत नेल्याची माहिती आयोगाने नव्या अहवालातून दिली. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने सदर अहवाल म्हणजे इशाराघंटा असल्याचे स्पष्ट केले. तर इराण संपूर्ण आखाती क्षेत्रासाठी धोकादायक ठरत असल्याचा इशारा जर्मनीने दिला. त्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम नागरी वापरासाठी नसून अणुबॉम्बची निर्मिती हाच त्यामागील उद्देश असल्याचा इस्रायलचा आरोप अमेरिका व युरोपिय देशांनी देखील मान्य केल्याचे दिसू लागले आहे.

मंगळवारी संयुक्त राष्ट्रसंघाचा विभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने आपला त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला. आयोगाच्या निरीक्षकांनी २१ जानेवारी रोजी इराणच्या फोर्दो अणुप्रकल्पाची केलेली पाहणी व त्यानंतर नोंदविलेले निष्कर्ष या अहवालात मांडले आहेत. या पाहणीआधी इराणने फोर्दो प्रकल्पातील आण्विक साहित्यांमधील बदलांची माहिती आयोगाला कळविली होती. पण निरीक्षकांनी पाहणी केली तेव्हा सदर प्रकल्पातील ‘आयआर-६’ प्रतिच्या सेंट्रिफ्यूजेसचे दोन कॅस्केडचे कॉन्फिग्‌‍रेशन दिलेल्या माहितीपेक्षा खूपच वेगळे होते. दुसऱ्या दिवशी निरीक्षकांनी या कॅस्केडमधील पार्टिकल्सची तपासणी केल्यानंतर युरेनियमचे संवर्धन ८३.७ टक्क्यांपर्यंत नेल्याचे उघड झाले, असे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यात अणुप्रकल्पात केलेल्या बदलांवेळी युरेनियमच्या संवर्धनात अनपेक्षित चढउतार झाल्याचे इराणने कळविले होते, अशी माहितीही आयोगाने दिली. यावर आयोग आणि इराणमध्ये चर्चा सुरू असून येत्या काळात सदर प्रकल्पाला आपले निरीक्षक सातत्याने भेट देत राहतील, असेही आयोगाने सांगितले.

इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे प्रवक्ते बहरोझ कमालवंदी यांनी युरेनियमच्या संवर्धनात झालेली ही वाढ काही काळाच्या ‘साईड ईफेक्ट’मुळे झाल्याचे म्हटले आहे. युरेनियमचे संवर्धन ६० टक्के शुद्धतेच्या पातळीवर नेताना हा बदल झाला असावा, असा दावा कमालवंदी यांनी केला. पण युरेनियमच्या संवर्धनात एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही संशयास्पद असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागानेदेखील अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालाची दखल घेतली आहे.

इराणच्या अणुकार्यक्रमाचा हा वेग साऱ्या जगासाठी इशाराघंटा असल्याचे पेंटॅगॉनने म्हटले आहे. तर जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ॲनालिना बेरबॉक यांनी इराणने युरेनिमचे संवर्धन ८४ टक्क्यांजवळ नेऊन आखाती देशांच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढविल्याचा दावा केला. आपल्याच जनतेला अतिशय निर्दयीपणे दडपणारी इराणची राजवट आखाती देशांची सुरक्षा व स्थैर्य देखील धोक्यात टाकत असल्याचे बेरबॉक यांनी म्हटले आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांची भेट घेतल्यानंतर जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ॲनालिना बेरबॉक इराणवर ही टीका केली.

२०१५ सालच्या अणुकरारानुसार इराणला फक्त ३.६७ टक्के इतकेच युरेनियमचे संवर्धन करण्याची परवानगी मिळाली होती. पण २०१८ साली अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढविल्याचा आरोप केला जातो. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी ९० टक्के इतक्या प्रमाणात युरेनियमचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे अणुऊर्जा आयोगानेच म्हटले होते. गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांखाली राहूनही इराणने अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रमाणात युरेनियमचे संवर्धन केल्याची टीका इस्रायलने याआधी केली होती. अशा परिस्थितीत, अणुऊर्जा आयोगाचा नवा अहवाल इस्रायलच्या आरोपांना बळ देणारा ठरत आहे.

leave a reply