स्पेनच्या कॅटालोनियातील निवडणुकीत स्वातंत्र्याला समर्थन देणार्‍या पक्षांना बहुमत

कॅटालोनिया

बार्सिलोना – स्पेनच्या कॅटालोनियात झालेल्या निवडणुकांमध्ये ‘स्वतंत्र कॅटालोनिया’ची मागणी करणार्‍या राजकीय पक्षांना बहुमत मिळाले आहे. रविवारी कॅटालोनियातील संसदेच्या १३५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या पक्षांना ७४ जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी २०१७ सालच्या निवडणुकांच्या तुलनेत स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या पक्षांच्या जागा वाढल्याने कॅटालोनियाच्या स्वातंत्र्याची मागणी पुन्हा एकदा जोर पकडण्याचे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत. स्पेनमधील सर्वात संपन्न प्रांत म्हणून ओळखण्यात येणार्‍या कॅटालोनियात गेल्या काही वर्षात स्वातंत्र्याच्या मागणीने अधिकच जोर पकडला आहे. चार वर्षांपूर्वी कॅटालोनिया सरकारने स्पेनच्या राजवटीला आव्हान देत सार्वमत घेतले होते. त्यात ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कॅटालोनियाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने निर्णायक मत दिले होते. मात्र स्पेन सरकारने हे सार्वमत बेकायदा ठरवून कॅटालोनियावर ‘डायरेक्ट रुल’ लादला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत कॅटालोनियातील अनेक नेत्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात धाडण्यात आले. त्यानंतर कॅटालोनियातून होणारी सार्वमताची मागणी काही प्रमाणात दडपण्यात स्पेन सरकारला यश मिळाले होते.

गेल्या वर्षभरात ब्रिटनने महासंघातून घेतलेली यशस्वी ‘एक्झिट’ आणि ‘स्कॉटलंड’मधून पुन्हा एकदा होत असलेली सार्वमताची मागणी या पार्श्‍वभूमीवर, कॅटालोनियातीलकॅटालोनिया निवडणुकांकडे स्पेनसह युरोपचे लक्ष लागून राहिले होते. रविवारी झालेल्या निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. कोरोनाची साथ असतानाही मिळालेला हा प्रतिसाद लक्ष वेधून घेणारा ठरला होता. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये स्पेनमधील सत्ताधारी राजवटीचा भाग असलेली ‘सोशॅलिस्ट पार्टी’ सर्वाधिक मते मिळविणारा पक्ष ठरल्याचे समोर आले.

मात्र निवडणुकांपूर्वीच आघाडी केलेल्या स्वतंत्र कॅटालोनियाचे समर्थन करणार्‍या पक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यात तीन पक्षांचा समावेश असून १३५ पैकी ७४ जागा मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. या आघाडीला अजून एका पक्षाचे समर्थन मिळण्याची शक्यता असल्याने कॅटालोनियात पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे समर्थन करणारी आघाडी सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काळात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची मागणी तीव्र होण्याची शक्यता असून ‘ईआरसी’ या पक्षाच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरते.

कॅटालोनिया‘मी युरोपियन सत्ताधार्‍यांना एक संदेश देऊ इच्छितो. निकाल अत्यंत स्पष्ट आहेत. स्वातंत्र्याचे समर्थन करणार्‍या पक्षांना बहुमत मिळाले आहे. आम्हाला एकूण मतांपैकी ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. कॅटालोनियाच्या जनतेने आपला कौल दिला आहे. स्वयंनिर्णयासाठी सार्वमत घेण्याच्या मुद्यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे’, असे ‘ईआरसी’चे वरिष्ठ नेते पेरे अरागोनस यांनी बजावले आहे.

स्पेनमध्ये स्वतंत्र भाषा व संस्कृती असणारा प्रांत म्हणून कॅटालोनिया ओळखला जातो. स्पेनमध्ये १९७० साली लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यानंतर या भागात कायम प्रांतिक राजकीय गटांचे वर्चस्व राहिले आहे. स्पेनची राजवट आपल्याला दुय्यम वागणूक देते, असा कॅटालोन जनतेचा दावा आहे. युरोपातील आर्थिक संकट व ‘ब्रेक्झिट’नंतर स्पेनपासून स्वतंत्र होण्याच्या मागणीला अधिकच बळ मिळत आहे. चार वर्षांपूर्वी स्पेन सरकारने सार्वमत व त्याचा निकाल नाकारल्यानंतरही कॅटालोनियातील जनतेत स्वातंत्र्याची भावना अजूनही तीव्र असून ही बाब स्पेनबरोबरच युरोपिय महासंघासमोरील चिंता अधिकच वाढविणारी ठरु शकते.

leave a reply