अमेरिका कुर्द दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे

- तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

कुर्दअंकारा – ‘तुर्की खरोखरच अमेरिकेचा नाटोतील सहकारी देश असेल तर अमेरिका दहशतवादविरोधी संघर्षात तुर्कीला साथ देईल. पण तसे न करता अमेरिका तुर्कीच्या जनतेवर हल्ले चढविणार्‍या कुर्द दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे’, असा आरोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केला. त्याचबरोबर तुर्कीने अमेरिकेच्या राजदूतांना समन्सही बजावले आहेत. याआधीही ओबामा प्रशासनकाळात तुर्कीने अमेरिका इराक-सिरियातील दहशतवाद्यांचा समर्थक देश असल्याचा आरोप केला होता.

गेल्या आठवड्यात इराकमधील दहशतवादी हल्ल्यात तुर्कीच्या १३ जणांचा बळी गेला होता. तुर्कीने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) या कुर्दांच्या संघटनेने हा हल्ला चढविल्याचा आरोप तुर्कीने केला आहे. याआधी तुर्कीच्या लष्कराने इराक, सिरियाच्या सीमेवरील कुर्द संघटनांविरोधात हाती घेतलेल्या कारवाईत ‘पीकेके’च्या ४८ जणांना ठार केले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून ‘पीकेके’ने आपल्या नागरिकांचा बळी घेतल्याचा दावा तुर्की करीत आहे. मात्र ठार झालेले तुर्कीचे नागरिक नसून ते तुर्कीचे पोलीस दल, लष्कराचे जवान व हेर होते, असे ‘पीकेके’ने म्हटले आहे.

कुर्दतरीही इराकमध्ये झालेल्या या हत्याकांडावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली होती. ‘जर पीकेकेने तुर्कीच्या नागरिकांची हत्या घडविल्याच्या बातम्या खर्‍या असतील, तर अमेरिका या हल्ल्याची अधिक कठोर शब्दात निंदा करते’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. पण अमेरिकेच्या या प्रतिक्रियेवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी कमालीचा संताप व्यक्त केला आहे. ‘जर-तर’ची भाषा बोलून अमेरिका तुर्कीची फसवणूक करीत असल्याचे ताशेरे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ओढले आहेत.

‘नाटोमध्ये अमेरिका आणि तुर्की एकत्र असतील व यापुढेही एकजूट कायम राखायची असेल तर अमेरिकेने तुर्कीशी प्रामाणिकपणे वागावे’, अशा परखड शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अमेरिकेला सुनावले. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया म्हणजे निव्वळ ढोंग आहे. अमेरिका कुर्द दहशतवाद्यांच्या पाठिशी असल्याचा ठपका एर्दोगन यांनी ठेवला. आपल्या नागरिकांवर झालेल्या या हल्ल्यानंतर तुर्की शांत बसणार नसल्याचे एर्दोगन म्हणाले.

यापुढे तुर्की सिरिया किंवा इराकमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई करील, अशी घोषणा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केली. तसेच इतर देशांनी यापुढे तुर्की आणि दहशतवादी यांच्यापैकी एकाची निवड करावी, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अमेरिकेला धमकावले. तुर्कीचे इतर नेतेही कुर्दांचा सूड घेण्याच्या धमक्या देऊ लागले आहेत. तसेच या हल्ल्याप्रकरणी पाश्‍चिमात्य देशांनी मूक राहण्याची भूमिका स्वीकारल्याची टीका केली.

तुर्कीतील कुर्दांची आक्रमक संघटना असलेल्या ‘पीकेके’ला तुर्कीने दहशतवादी घोषित केले होते. तसेच या संघटनेपासून आपल्या अखंडतेला धोका असल्याचे सांगून तुर्कीने ‘पीकेके’विरोधात संघर्ष छेडला आहे. अमेरिका तसेच युरोपिय महासंघाने देखील तुर्कीतील ‘पीकेके’ला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिली होती. पण इराक आणि सिरियातील कुर्द संघटनांबरोबर अमेरिकेचे लष्करी सहकार्य आहे. इराकमधील कुर्दांनी प्रस्थापित केलेल्या स्वायत्त कुर्दिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा आहे. तर सिरियातील दहशतवादविरोधी मोहिमेसाठी अमेरिकेने कुर्दांना हाताशी घेतले होते.

अमेरिकेच्या या भूमिकेवर तुर्कीने संताप व्यक्त केला होता. अमेरिका दहशतवादविरोधी कारवाईसाठी दहशतवादी संघटनेचे सहाय्य घेत असल्याचा आरोप एर्दोगन यांनी केला होता. ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना तुर्कीने स्वीकारलेल्या या भूमिकेमुळे अमेरिका आणि तुर्कीतील संबंध बिघडले होते. बायडेन यांच्या प्रशासनातही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

leave a reply