भारतातील गुंतवणुकीच्या संधीची जाणीव अमेरिकेसह जगालाही करून द्या

व्यापारमंत्री गोयल यांचे अमेरिकेतील भारतीयांना आवाहन

नवी दिल्ली – विशाल जनसंख्येमुळे प्रचंड प्रमाणात होणारी खपत, कायद्याचे राज्य व पारदर्शक अर्थव्यवस्था, यामुळे भारत गुंतवणुकीची अफाट संधी देणारा देश म्हणून उदयाला येत आहे. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनी याची माहिती अधिक प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता असून भारतात गुंतवणूक वाढविण्यासाठी अमेरिकेतील भारतीयांनी आपल्या प्रभावाचा वापर करावा, असा संदेश व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी दिला आहे.
Piyush Goyal in USतीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी न्यू जर्सी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी व्यापारमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे दाखले दिले. 2021-22च्या वित्तीय वर्षात भारतातील थेट परकीय गुंतवणूक 84 अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचली होती. तर या काळात भारताने पहिल्यांदाच 670 अब्ज डॉलर्स इतकी निर्यात केली. पुढच्या काळात भारताच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत राहिल आणि या प्रगतीत जगभरात विखुरलेले अनिवासी भारतीय फार मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतात, असा विश्वास व्यापारमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
लवकरच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. फार मोठे बदल घडवून आणणाऱ्या सुधारणा आणि जनसंख्येत मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या तरुणांमुळे भारत सहजपणे तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. याची माहिती सर्वदूर पसरविण्यासाठी  अमेरिकेतील भारतीयांनी आपल्या प्रभावाचा वापर करावा, असे आवाहन पियूष गोयल यांनी केले आहे. भारत तुमच्या उद्योगासाठी विश्वासार्ह पुरवठा साखळीचा भाग बनेल आणि भारतातील गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायी ठरेल, हे देखील अमेरिकेतील भारतीयांनी आपण कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या लक्षात आणून द्यावे, असे गोयल पुढे म्हणाले.
दरम्यान, आपल्या तीन दिवसांच्या या अमेरिका दौऱ्यात व्यापारमंत्री पियूष गोयल अमेरिकी उद्योजग व गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. 11 जानेवारी रोजी  भारत व अमेरिकेमधील 13 ‘ट्रेड पॉलिसी फोरम-टीपीएफ’ पार पडेल. त्यात व्यापारमंत्री गोयल सहभागी होणार असून ते अमेरिकेच्या व्यापारी प्रतिनिधी कॅथरिन टाय यांच्याशी पियूष गोयल चर्चा करणार आहेत.  

leave a reply