पाकिस्तान युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरविण्याच्या तयारीत

159 कंटेनर्स इतकी शस्त्रे व दारूगोळा युक्रेनला धाडणार

ukraine pak russiaइस्लामाबाद – रशियाकडे स्वस्त दरात इंधनाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानने रशियाला धक्का देण्याची तयारी केली आहे. पुढच्या दोन आठवड्यात पाकिस्तान युक्रेनला लष्करी साहित्यांनी भरलेले 159 कंटेनर्स रवाना करणार आहे. पोलंडमार्फत पाकिस्तान युक्रेनसाठी हे सहाय्य पुरविणार असल्याचे सांगितले जाते. याआधीही पाकिस्तानने युक्रेनला शस्त्रे पुरविल्याचे आरोप झाले होते. मात्र यावेळी पाकिस्तान युक्रेनला पुरवित असलेले हे लष्करी सहाय्य रशियाच्या संतापात अधिकच भर टाकणारे ठरेल.

पाकिस्तानचे लष्कर युक्रेनसाठी रॉकेट्स, गोळ्यांसाठी लागणारे साहित्य, दारुगोळा तसेच फ्यूज इंजिन पुरविणार आहे. ‘बीबीसी वेसूवियूस’ जहाजातून हा दारुगोळा पाठविण्यात येणार असल्याची माहिती याप्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पाकिस्तानातील शिपिंग कंपनी 159 कंटेनर्स घेऊन कराची बंदरातून पोलंडच्या दांस्क बंदरासाठी रवाना होईल. या लष्करी सहाय्याच्या मोबदल्यात पाकिस्तान युक्रेनकडून ‘एमआय-17’ या हेलिकॉप्टर्सच्या देखभालीसाठी सहाय्य मिळविणार असल्याचा दावा केला जातो.

pak rocketsरशियाबरोबरचे युद्ध भडकल्यानंतर पाकिस्तानने युक्रेनला शस्त्रे व दारुगोळा पुरविण्याची ही दुसरी वेळ ठरते. याआधी पाकिस्तानने ब्रिटनमार्गे युक्रेनला लष्करी सहाय्य केले होते. यासाठी पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील नूर खान हवाईतळाचा वापर करण्यात आला होता. भूमध्य समुद्रातील ब्रिटनच्या विमानतळाचा वापर करून सदर विमान रोमानियातील ॲवराम इनाकू क्लूज उतरल्याचा दावा केला जातो. युरोपिय देशांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या नेत्यांनी युक्रेनला हे सहाय्य पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. पाकिस्तानी बनावटीच्या शस्त्रांचे फोटोग्राफ्स वायरल झाले होते. पण पाकिस्तानने सदर आरोप फेटाळले होते.

कोणत्याही देशाने युक्रेनला शस्त्रसज्ज करू नये. असे झाल्यास युक्रेनला पुरविण्यात येणारा शस्त्रसाठा नष्ट केला जाईल, असा इशारा रशियाने वारंवार दिला आहे. तरी देखील रशियाकडे स्वस्तदरात इंधनाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानने युक्रेनला शस्त्रे पुरविणे सुरू ठेवल्याची शक्यता वाढत आहे. पण युक्रेनला पुरविलेल्या या लष्करी सहाय्यावर रशियातून प्रतिक्रिया उमटली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे नेते व लष्करी अधिकारी रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून पैसे कमाविण्याच्या तयारीत असल्याचे आरोप रशियन विश्लेषक व नेत्यांनी याआधी केले होते.

पाकिस्तानी लष्कर व कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’शी संलग्न असलेले युरोपमधील पाकिस्तानी वंशाचे उद्योजक यासाठी काम करीत असल्याची माहिती समोर आली होती. केस्ट्राल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लियाकत अली बेग यांनी गेल्या वर्षी मे-जून महिन्यात रोमानिया, पोलंड आणि स्लोव्हाकिया या देशांचा दौरा केला होता. यानंतर रशियन संसदेमध्ये काही नेत्यांनी पाकिस्तानबरोबरचे सहकार्य तोडून या देशाला अद्दल घडविण्याची मागणी झाली होती. युक्रेन-पाकिस्तानमधील या सहकार्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

हिंदी

leave a reply