झारखंडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्याचा कट उधळला

- सुरक्षादलांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

रांची – झारखंडच्या रांची, खूंटी, सरायकेला व चाईबासा जिल्ह्यात पोलिसांसह सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईमुळे माओवाद्यांकडून मोठे हल्ले घडविण्याचा कट उधळण्यात आला आहे.यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. झारखंडचे पोलीस महासंचालक एम. व्ही. राव यांनी ही माहिती दिली.

कट

दोन आठवड्यांपूर्वी बांगलादेश व म्यानमारमार्गे ‘एके-४७’ रायफली तसेच ५० हजारांहून अधिक काडतुसे माओवाद्यांपर्यत पोहोचल्याची माहिती समोर आली होती. सर्वात जास्त परदेशी शस्त्रे झारखंडमध्ये माओवाद्यांनी खरेदी केली आहेत, असा खुलासाही राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला होता. त्यामुळे मोठ्या कटाची शक्यता लक्षात घेऊन माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षादलांनी मोठी कारवाई हाती घेतल्याचे सांगण्यात येते.

झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये मोहीम तीव्र करण्यात आली होती. शनिवारी सकाळी माझगावमध्ये सुरक्षादल व माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत जिवीतहानी झाली नाही. मात्र यावेळी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून माओवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यापूर्वी गेल्या काही दिवसात माओवाद्यांविरोधात होत असलेल्या कारवाईची माहिती झारखंडचे पोलीस महासंचालक एम. व्ही. राव यांनी दिली.

कट

‘गेल्या दहा दिवसात राज्याच्या विविध भागातून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि भुसुरूंग जप्त करण्यात आले. सुरक्षादलांवर हल्ल्यांचे प्रयत्न उधळण्यात आले आहेत. सुरक्षादलांनी काही माओवादी पकडले आहेत. २८ ऑगस्ट रोजी सरायकेला-खरसावाण जिल्ह्यातील राय-सिंदरी पर्वतावरुन सुरक्षादलांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले. यात पाच किलोचे सात आयईडी, चार किलोचे ६५ आयईडी, ४०० मीटरची कॉर्डेक्स वायर, १७ इलेक्ट्रिक डिटोनेटर, चार रायफल, एक पिस्तूल आणि ९७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर परिसरात सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे’, अशी माहिती राव यांनी दिली.

माओवाद्यांच्या विरोधात आता बिहार आणि ओडिशाच्या सहाय्याने आंतरराज्यीय कारवाईही हाती घेण्यात आली असून त्याचे तपशील उघड करणे योग्य ठरणार नाही, असे पोलीस महासंचालक एम. व्ही. राव यांनी स्पष्ट केले.काही दिवसापूर्वी ‘आयटीबीपी’चे आठ हजार जवान माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या राज्यात कायमस्वरूपी तैनात करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे माओवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. अतिरिक्त तैनाती व मोहिमामुळे अस्वस्थ झालेले माओवादी सुरक्षादलांसह राज्यात मोठा हल्ला करण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे हा कट अपयशी ठरल्याचे झारखंडमधील कारवाईतून समोर आले आहे.

leave a reply