‘एफएटीएफ’च्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकल्यास पाकिस्तानचा इराण होईल

- पाकिस्तानचे पंतप्रधान

इस्लामाबाद – ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) ब्लॅक लिस्ट’मध्ये पाकिस्तानचा समावेश झाला तर महागाईचा आगडोंब उसळेल, अर्थव्यवस्था कोसळेल आणि पाकिस्तानचा इराण होईल, अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली. असे झाले तर त्याला विरोधी पक्ष जबाबदार असतील, असा आरोप इम्रान खान यांनी केला. भारत पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रयत्‍न करीत आहे आणि पाकिस्तानचे विरोधी पक्ष भारताला साथ देत आहेत, असा ठपका इम्रान खान यांनी ठेवला.

'ब्लॅक लिस्ट'

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान ‘एफएटीएफ‘च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट करण्याचा इशारा ‘एफएटीएफ’ने दिला होता. ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला २७ मागण्या केल्या होत्या. त्यातील १४ मागण्या पाकिस्तानने पूर्ण केल्या, तर पुढील मागण्यांची पूर्तता काण्यासाठी ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला जून महिन्याची डेडलाईन दिली होती. पण कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ‘एफएटीएफ’ची बैठक पुढे ढकलण्यात आली. पण यामुळे पाकिस्तानवरचे संकट टळलेले नाही. आता ‘एफएटीएफ’च्या बैठकीची तारीख जवळ आल्यावर पाकिस्तानची बैचेनी वाढली असून ‘एफएटीएफ’ला दाखविण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाईचे नाटक करीत आहे. यासाठी पाकिस्तानने ८० हून अधिक दहशतवादी व त्यांच्या संघटनांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी ‘अँन्टी मनी लॉन्डरिंग’ आणि ‘इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी वक्फ’ ही दोन विधेयके सादर केली होती. ‘एफएटीएफ’ची कारवाई टाळण्यासाठी या दोन विधेयकांना समर्थन द्यावे, अशी मागणी इम्रान यांनी केली होती. मात्र या विधेयकांचा एफएटीएफच्या सुचनांशी काहीही संबंध नाही, उलट याचा वापर इम्रान खान आपल्या राजकीय प्रतिस्पर्धीच्या विरोधात करतील, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानला एफएटीएफ’च्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारतालाही विरोधी पक्ष साथ देत आहे, या आरोपांचाही विरोधी पक्षनेत्यांनी समाचार घेतला.

'ब्लॅक लिस्ट'

इम्रान खान यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच पाकिस्तानवर ही वेळ ओढावली आहे, अशी जळजळीत टीका विरोधी पक्षांबरोबरच पाकिस्तानची माध्यमेही करू लागली आहेत. एकदा का पाकिस्तानचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश झाला की, अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे सारे मार्ग बंद होतील, पाकिस्तानचा रुपया अधिकच घसरेल, अशी भीती पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी, या परिस्थितीला आपले सरकार नाही तर, विरोधी पक्ष जबाबदार असतील, असे सांगून पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे भारत पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक राजनैतिक धोरण राबवून ब्लॅक लिस्ट करण्याच्या तयारीत आहे. तर पाकिस्तानचे सरकार आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी खंत माध्यमे व्यक्त करीत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी भारताने पुलवामा येथील हल्ल्याचे तेरा हजाराहून अधिक पानांचे आरोपपत्र तयार केले व या घातपाताच्या पाकिस्तानातील सूत्रधारांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच या प्रकरणात लाखो रुपयांच्या रक्कमेचे अवैधरित्या हस्तांतरण झाल्याची बाब या आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे. हे सारे भारताने पाकिस्तानला एफएटीएफच्या काळ्या यादीत टाकण्यासाठीच घडवून आणले, अशी चर्चा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये रंगली आहे. भारताच्या या मोहिमेला यश मिळेल आणि खरोखरच पाकिस्तान ब्लॅक लिस्ट होईल, अशी भीती काही पाकिस्तानी विश्लेषकांनीही व्यक्त केली आहे. अशा काळात पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्याची तयारी करीत असल्याचा घणाघाती आरोप या देशातील काही जबाबदार पत्रकारांनी केला आहे.

leave a reply