गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने ‘आयएनएस मोरमुगाओ’च्या सागरी चाचण्यांना सुरुवात

पणजी – ‘प्रोजेक्ट१५बी’अंतर्गत उभारण्यात येणार्‍या चार विनाशिकांपैकी दुसरी विनाशिका ‘आयएनएस मोरमुगाओ’च्या सागरी चाचण्यांना रविवारपासून सुरूवात झाली. दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध बंदराच्या नावाने विशाखापट्टणम श्रेणीतील दुसर्‍या विनाशिकेचे नाव ‘आयएनएस मोरमुगाओ’ असे ठेवण्यात आले आहे. रविवारी गोवा मुक्ती दिन अर्थात गोव्याच्या पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीचा ६०वा वर्धापनदिन होता. या निमित्ताने ‘आयएनएस मोरमुगाओ’च्या पहिल्या टप्प्यातील सागरी चाचण्यांना सुरूवात करण्यात आली.

गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने ‘आयएनएस मोरमुगाओ’च्या सागरी चाचण्यांना सुरुवात‘प्रोजेक्ट१५बी’अंतर्गत उभारण्यात आलेली पहिली विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ गेल्या महिन्यात २१ नोव्हेंबर रोजी आपल्या चाचण्या संपवून भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. तर विशाखापट्टणम श्रेणीतील दुसरी विनाशिका ‘आयएनएस मोरमुगाओ’च्या सागरी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. २०२२ सालाच्या अखेरीपर्यंत ही विनाशिका भारतीय नौदलात सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जाते. भारतीय नौदलाने गोवा मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. या विनाशिकेला गोव्याशी संबंधीत प्रमुख बंदराचे नाव देऊन गोवा राज्याला समर्पित करण्यात आले आहे. त्यामुळे गोवा मुक्ती संग्रामाचा ६०वा वर्धापन दिन गोवा राज्यात साजरा होत असताना ‘आयएनएस मोरमुगाओ’ विनाशिकेच्या सुरू झालेल्या सागरी चाचण्यांनी पुन्हा एकदा भारतीय नौदलाने पोर्तुगिजांविरोधातील लढाईत बजावलेल्या कामगिरीची आठवण करून दिली आहे.

विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका या कोलकाता श्रेणीतील विनाशिकांची अद्ययावत आवृत्ती आहे. विशाखापट्टणम श्रेणीतील या विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यातील सर्वात आधुनिक व शक्तीशाली विनाशिका ठरतात. पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात या श्रेणीतील विनाशिका अत्यंत प्रभावी ठरू शकतात. टॉर्पेडोबरोबर या विनाशिकांवर ऍन्टी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स तैनात केली जाऊ शकतात. त्यामुळे चीनचा धोका आणि चिनी नौदलातील पाणबुड्यांचा ताफा पाहता विशाखापट्टणम श्रेणीतील या विनाशिकांचे महत्त्व वाढते.

याशिवाय या विनाशिकांवर मध्यम आणि लघु पल्ल्याच्या तोफा तैनात करण्यात येणार आहेत. तसेच या विनाशिकेवर जहाजविरोधी व जहाजावरून जमिनीवर हल्ल्या चढविण्यास सक्षम असलेल्या १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची तैनाती होऊ शकते. तसेच हवेतील लक्ष्य अचून भेदणारी आठ बराक क्षेपणास्त्रही तैनाती केली जाऊ शकतात.

मेक इन इंडियाअंतर्गत या श्रेणीतील चारही विनाशिकांची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये करण्यात आली आहे. या श्रेणीतील पहिली विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलात आधीच दाखल झाली आहे, तर ‘आयएनएस मोरमुगाओ’नंतर ‘आयएनएस इंफाळ’ या तिसर्‍या विनाशिकेच्या सागरी चाचण्या पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. २०१७ सालात ‘आयएनएस इंफाळ’चे जलावतरण झाले होते. तर प्रोजेक्ट१५बीअंतर्गत उभारण्यात येणारी विशाखापट्टणम श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस सुरत’ची सध्या बांधणी सुरू आहे.

leave a reply