‘रोडन्ट प्लेग’मुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार

- शेतीच्या प्रचंड नुकसानानंतर नव्या साथीची भीती

कॅनबेरा – गेल्या काही वर्षात दुष्काळ, वणवे व महापुरासारख्या भयंकर आपत्तींना तोंड देणार्‍या ऑस्ट्रेलियासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असणार्‍या ‘न्यू साऊथ वेल्स’सह पाच राज्यांमध्ये ‘रोडन्ट प्लेग’ अर्थात उंदरांच्या साथीने हाहाकार माजविला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या राज्यांमध्ये कोट्यवधी उंदरांनी धुमाकूळ घातला असून त्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचे रुग्णही आढळण्यास सुरुवात झाली असून त्याची साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

‘रोडन्ट प्लेग’मुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार - शेतीच्या प्रचंड नुकसानानंतर नव्या साथीची भीतीऑस्ट्रेलियातील सर्वाधिक शेती व त्याच्याशी निगडीत उद्योग ‘न्यू साऊथ वेल्स’ या राज्यात केंद्रित आहेत. त्याचवेळी देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असणारे सिडनी याच राज्याचा भाग आहे. ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेत या राज्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील शेतांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात उंदीर आढळण्यास सुरुवात झाली. शेतकर्‍यांनी त्याचे फोटो तसेच व्हिडिओही प्रसिद्ध केले असून शेतापासून गोदामापर्यंत हजारो उंदरांच्या झुंडी त्यात दिसून आल्या आहेत. काही ठिकाणी तर ‘उंदरांचा पाऊस’ पडल्याचेही दावे करण्यात आले आहेत.

‘रोडन्ट प्लेग’मुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार - शेतीच्या प्रचंड नुकसानानंतर नव्या साथीची भीतीया उंदरांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतीचा पुढील हंगामही संकटात आल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. सर्व प्रकारच्या उपाययोजनांनंतरही उंदरांचा प्लेग रोखण्यात शेतकर्‍यांना तसेच स्थानिक यंत्रणांना अपयश येत आले आहे. राज्यातील उंदरांची संख्या अक्षरशः कोट्यवधींच्या घरात गेली असून आता त्यांनी हॉस्पिटल्स, शाळा यासारख्या ठिकाणीही धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हॉस्पिटल्समधील रुग्णांना चावण्यापर्यंत उंदरांची मजल गेली असून स्थानिक यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र समोर येत आहे.

न्यू साऊथ वेल्समध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचे २३ रुग्णही आढळले आहेत. उंदरांच्या प्लेगवर नियंत्रण मिळविता आले नाही तर या रोगाची साथ येऊ शकते, असे तज्ज्ञांनी बजावले आहे. न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने शेतकर्‍यांसाठी सुमारे चार कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्यही जाहीर केले आहे. मात्र उंदरांच्या प्लेगने न्यू साऊथ वेल्सपाठोपाठ क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया व साऊथ ऑस्ट्रेलिया या राज्यांमध्येही प्रवेश केला असून, हे संकट अधिक गंभीर रुप धारण करु शकते, असा दावा करण्यात येत आहे.

leave a reply