अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ट्रकमध्ये 46 निर्वासितांचे मृतदेह आढळले

निर्वासितांचे मृतदेहवॉशिंग्टन – अमेरिका-मेक्सिको सीमेवर असलेल्या टेक्सास प्रांतातील सॅन ॲन्टोनिओ भागातील ट्रकमध्ये 46 निर्वासितांचे मृतदेह आढळले आहेत. उष्माघात व पाण्याचा अभाव यामुळे निर्वासितांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांमध्ये घडलेली ही सर्वात मोठी व भयानक दुर्घटना असल्याचे सांगण्यात येते. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी या भयावह मानवतावादी शोकांतिकेसाठी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहे. हे बळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ‘ओपन बॉर्डर पॉलिसी’चा परिणाम आहे, अशी घणाघाती टीका ॲबॉट यांनी केली.

निर्वासितांचे मृतदेहसोमवारी संध्याकाळी अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील सॅन ॲन्टोनिओ भागातील रेल्वेरुळांजवळ एक 18 चाकी ‘ट्रेलर-ट्रक’ बेवारस स्थितीत सोडून दिलेला आढळला होता. पोलीसांसह इतर सुरक्षायंत्रणांनी केलेल्या तपासात या ट्रकमध्ये 46 जणांचे मृतदेह मिळाले. 16 जण जिवंत असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमध्ये रेफ्रिजरेशन सिस्टिम बसवण्यात आली होती. मात्र ती बंद पडल्याने ट्रकमधील तापमान वाढून निर्वासितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ट्रकमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याचेही उघड झाले.

निर्वासितांचे मृतदेहमृतांमध्ये मेक्सिको तसेच ग्वाटेमालाच्या नागरिकांचा समावेश आहे. मेक्सिको सरकारने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सॅन ॲन्टोनिओमध्ये पाठविले असून ते संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले. सर्व निर्वासित मेक्सिकोमधूनच आले असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. स्थानिक यंत्रणांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. गेल्या काही दिवसात टेक्सास प्रांतात उष्णतेची लाट असून तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. या वाढत्या तापमानामुळेच निर्वासितांचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येते.

ट्रक ज्या ठिकाणी सोडण्यात आला होता तो भाग निर्वासितांसाठी ‘ड्रॉप पॉईंट’ म्हणून ओळखण्यात येतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली सदर दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेत होणाऱ्या मानवी तस्करीच्या प्रकरणातील ही सर्वात मोठी दुर्घटना मानली जात असून यामुळे निर्वासितांच्या घुसखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे अनेक निर्णय जाहीर केले आहेत. त्यामुळे मेक्सिको सीमेवरून लाखो निर्वासितांचे लोंढे दर महिन्याला अमेरिकेत घुसखोरी करीत आहेत. त्यांना रोखण्यात सीमा भागातील सुरक्षा यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. टेक्साससारख्या प्रांतांनी आणीबाणीचे संकेत देत ‘नॅशनल गार्ड’ तैनात करण्याचा इशारा दिला होता. पण त्यानंतरही घुसखोरी सुरुच असून सॅन ॲन्टोनिओ मधील घटना त्याचे भयावह परिणाम दाखवून देणारी ठरते.

leave a reply