इथिओपियाच्या हल्ल्यात सुदानच्या सात जवानांचा बळी

सात जवानांचा बळीखार्तुम/आदिस अबाबा – इथिओपियाच्या लष्कराने सीमाभागात केलेल्या हल्ल्यात सुदानच्या सात जवानांचा बळी गेला आहे. हल्ल्यात एक नागरिकही ठार झाल्याचा आरोप सुदानने केला. इथिओपियाने आपल्यावरील हा आरोप फेटाळला असून सुदानचे जवान इथिओपियाच्या हद्दीत घुसल्याने केलेल्या कारवाईत जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. यापूर्वी तिगरेतील संघर्ष तसेच नाईल नदीवरील धरणाच्या मुद्यावरून सुदान व इथिओपियात तणावाचे वातावरण आहे. अशातच ही घटना घडल्याने दोन देशांमध्ये संघर्षाचा नवा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

गेल्या आठवड्यात इथिओपियाच्या लष्कराने सुदानच्या ‘अल-फश्का’ प्रांतातून सुदानी जवानांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची हत्या केल्याचा आरोप सुदानी लष्कराने केला. इथिओपियन लष्कराचे हे कृत्य निंदनीय असून त्याला जबर प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा सुदानी लष्कराने दिला. इथिओपियाने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. सुदानी लष्कराच्या अंतर्गत वादातून जवान मारले गेल्याचा व घटनेची चौकशी सुरू असल्याचा दावा इथिओपियाकडून करण्यात आला.

सात जवानांचा बळीसुदान व इथिओपियामध्ये 1600 किलोमीटर्सची सीमारेषा असून त्यातील काही भागावर दोन्ही देशांनी दावे ठोकलेले आहेत. सुदानच्या ‘अल-फश्का’ प्रांताची 600 किलोमीटरची सीमारेषा इथिओपियाला जोडलेली असून हा सीमाभाग कायम वादाचा मुद्दा राहिला आहे. ‘अल-फश्का’ पारंपारिकदृष्ट्या सुदानचा भाग असला तरी इथिओपियातील राजवटींनी आपल्या जनतेला त्यात घुसखोरी करण्याची मोकळीक दिली होती.

इथिओपियाच्या लष्कराकडून वारंवार सुदानच्या ‘अल-फश्का’ प्रांतात लष्करी तुकड्या पाठविण्यात येत असल्याच्या घटना यापूर्व़ीही उघड झाल्या आहेत. गेल्या वर्षी इथिओपियाची लढाऊ विमानेही सुदानच्या हद्दीत घुसल्याचे उघड झाले होते. त्याचवेळी 2020 सालापासून पेटलेल्या तिगरेतील संघर्षानंतर सुदानमध्ये दाखल झालेले निर्वासित हादेखील वादाचा मुद्दा राहिला आहे. सुदानकडून तिगरेतील बंडखोर गटांना सहाय्य पुरविले जात असल्याचा आरोप इथिओपियाकडून करण्यात येतो.

त्यामुळे दोन्ही देशांमधील सीमाभागात सातत्याने तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, सुदानी जवानांच्या मृत्यूनंतर सुदानने इथिओपियातील आपला राजदूत माघारी बोलावला असून संयुक्त राष्ट्रसंघात तक्रार दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply