युक्रेनकडून होणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर रशिया व बेलासरुमध्ये लष्करी सरावाला सुरुवात

सरावाला सुरुवातमॉस्को/मिन्स्क – रशिया लवकरच युक्रेनविरोधात नवे व मोठे हल्ले करील आणि त्यासाठी बेलारुसचाही वापर होऊ शकतो, असे दावे युक्रेनकडून करण्यात येत आहेत. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर, रशिया व बेलारुसच्या लष्करामध्ये सरावाला सुरुवात झाली असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही त्याला दुजोरा दिला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह व संरक्षणमंत्री सर्जेई शोइगू बेलारुस दौऱ्यावर आहेत. रशियाचे वरिष्ठ नेते बेलारुसमध्ये असताना दोन देशांमध्ये संरक्षण सरावाचे आयोजन होणे ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरते.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी तसेच त्यानंतरही बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी रशियाला वारंवार भेट दिली होती. रशियाच्या वरिष्ठ अधिकारी तसेच नेत्यांनीही बेलारुसचा दौरा केला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारुसचा दौरा करण्याची गेल्या साडेतीन वर्षातील ही पहिलीच वेळ ठरली आहे. पुतिन यांच्याबरोबरच संरक्षण तसेच परराष्ट्र विभागाचे मंत्रीही दौऱ्यावर असल्याने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

सरावाला सुरुवातराष्ट्राध्यक्षांसह प्रमुख मंत्री दौऱ्यावर असतानाच रशिया व बेलारुसमध्ये व्यापक संरक्षणसराव सुरू झाला आहे. या सरावात लष्कर तसेच हवाईदलाची पथके सहभागी झाली आहेत. रशियाचे जवळपास दहा हजार जवान सध्या बेलारुसमध्ये तैनात असून लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रेही तैनात असल्याचे सांगण्यात येते. रशियाची ही तैनाती युक्र्रेनविरोधातील नव्या हल्ल्याची तयारी असल्याचे दावे युक्रेनकडून करण्यात येत आहेत. मात्र रशिया व बेलारुस या दोन्ही देशांनी हे दावे फेटाळले आहेत. बेलारुसने आपल्या सीमेवरील तैनाती वाढविली असली तरी हल्ल्याची शक्यता नाकारली आहे.

दरम्यान, रशियाने दिलेली इस्कंदर क्षेपणास्त्रे व ‘एस-४००’ हवाईसुरक्षा यंत्रणा कार्यरत झाल्याची माहिती बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी केलेल्या रशिया दौऱ्यात पुतिन यांनी बेलारुसच्या संरक्षणसज्जतेसाठी नव्या यंत्रणा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, नवी क्षेपणास्त्रे व हवाईसुरक्षा यंत्रणा पुरविण्यात आल्याचे रशियाकडून सागंण्यात आले.

leave a reply