पाकिस्तानी लष्कराने ‘तेहरिक’च्या तावडीतून जवानांना सोडविले

पाकिस्तानी लष्करइस्लामाबाद/पेशावर – पाकिस्तानी लष्कराच्या दहशतवादविरोधी पथकाच्या जवानांना ओलीस धरणाऱ्या तेहरिकच्या ३३ दहशतवाद्यांचा खातमा करण्यात यश मिळाले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या कारवाईत ओलीस जवानांची सुरक्षित सुटका केल्याची घोषणा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली. पण या एका कारवाईमुळे पाकिस्तानची समस्या संपलेली नाही. गेल्या १२ तासात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या आणखी एका तळाचा दहशतवाद्यांनी ताबा घेतल्याची बातमी आहे. तर वझिरिस्तानातील आत्मघाती स्फोटात पाकिस्तानी लष्कराचे जवान ठार झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा येथील लष्कराच्या दहशतवादविरोधी पथकाने बानू येथील तळावर ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांना चौकशीसाठी आणले होते. या तळावरील मेजर पदावरील अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही चौकशी सुरू होणार, तितक्यात तेहरिकच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावरच डाव उलटवला, याची कबुली संरक्षणमंत्री आसिफ यांनी मंगळवारी दिली. पाकिस्तानी लष्कर व तेहरिकच्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या संघर्षात चार जवानांचा बळी गेला होता.

पाकिस्तानी लष्करयानंतर तेहरिकच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून आपल्या मागण्या मांडल्या होत्या. तेहरिकच्या सर्व दहशतवाद्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितपणे अफगाणिस्तानात पोहोचविण्याची मागणी यात केली होती. तेहरिकच्या या कारवाईने पाकिस्तान हादरल्याचे दिसत होते. आपल्या लष्कराचा अभिमान असलेल्या पाकिस्तानी जनता तसेच पत्रकारांसाठी हा मोठा धक्का होता. तेहरिकने एकट्याने ही कारवाई केली नसेल, अशी शक्यताही पाकिस्तानी पत्रकारांनी व्यक्त केली होती.

तसेच ५६ तास उलटल्यानंतरही पाकिस्तानचे सरकार किंवा लष्कराने तेहरिकच्या मागण्यांवर प्रतिक्रिया दिली नाही म्हणून पाकिस्तानी जनतेने जोरदार टीका केली होती. आपल्या जवानांची सुरक्षा न करू शकणारे पाकिस्तानचे नेते व लष्कर आपली जनता व अण्वस्त्रांची कशी सुरक्षा करील, असे सवाल पाकिस्तानी पत्रकारांनी केले होते. पाकिस्तानी जवानांपेक्षा तेहरिकचे दहशतवादी अधिक प्रशिक्षित व तयारीत असल्याची टीकाही या पत्रकारांनी केली होती.

अशा परिस्थितीत, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या ‘स्पेशल सर्व्हिस ग्रूप’च्या कमांडोज्‌‍नी बानू येथील तळावर कारवाई करून ३३ दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. या कारवाईत दोन कमांडो मारले गेले तर एक जखमी झाल्याचेही ख्वाजा आसिफ म्हणाले. तेहरिकने ओलीस ठेवलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या जवानांची सुखरूप सुटका केल्याची माहिती आसिफ यांनी दिली. या कारवाईचे काही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले.

खैबर-पख्तूनख्वाच्या बानूमध्ये पाकिस्तानी लष्कराची ही कारवाई सुरू असताना दक्षिण वझिरिस्तानातील वाना भागातील लष्कराच्या आणखी एका तळावर तेहरिकच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तेहरिकने पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना ओलीस धरल्याची माहिती समोर येत आहे. तेहरिकच्या हल्ल्यात लष्करी तळाच्या प्रवेशद्वाराचे झालेले नुकसान दाखविणारा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. तर उत्तर वझिरिस्तानच्या मिरानशहा येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा बळी गेला. यामध्ये एका जवानाचा समावेश असल्याचे पाकिस्तानी लष्करानेच जाहीर केले.

leave a reply