फिलिपाईन्समधील लष्करी विमान दुर्घटनेत 42 जवानांसह 45 जणांचा बळी

मनिला – फिलिपाईन्समधील जोलो आयलंड भागात लष्करी विमानाला झालेल्या अपघातात 42 जवानांसह 45 जणांचा बळी गेला आहे. दुर्घटनेदरम्यान 49 जणांचा जीव वाचविण्यात यश आले असून त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘लॉकहिड सी-130 हर्क्युलस’ प्रकारातील हे विमान या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेकडून फिलिपाईन्सला सुपूर्द करण्यात आले होते. फिलिपाईन्सच्या संरक्षणदलाला यावर्षी चौथ्या हवाई दुर्घटनेचा फटका बसला असून यापूर्वीच्या अपघातांमध्ये 14 जणांचा बळी गेला आहे.

लष्करी विमानफिलिपाईन्सच्या मिंदानाओ आयलंडमधून दक्षिण फिलिपाईन्समधील जोलो आयलंडमध्ये लष्करी तैनातीसाठी जवानांची तुकडी पाठविण्यात येत होती. विमानात तीन वैमानिक, पाच कर्मचार्‍यांसह 80हून अधिक जवानांचा समावेश होता, अशी माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झना यांनी दिली. जोलो आयलंडवरील विमानतळाची धावपट्टी इतर विमानतळांच्या तुलनेत लहान आहे. त्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटल्यास दुर्घटनेची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येते.

लष्करी विमान‘सी-130 हर्क्युलस’ धावपट्टीवर उतरताना ‘ओव्हरशूट’ झाल्याने विमानतळानजिक असलेल्या गावात घुसल्याचे समोर आले आहे. ओव्हरशूट झाल्यानंतर विमानाने पेट घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली. विमानाचा शेपटाकडचा भाग फक्त बचावला असून बाकी सर्व विमान उद्ध्वस्त झाल्याचे फोटोग्राफ्ट प्रसिद्ध झाले आहेत. जवळपास 17 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती लष्करी अधिकार्‍यांनी दिली. प्राथमिक तपासात विमानावर बाहेरून हल्ला झाल्याचे पुरावे निदर्शनास आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्करी विमानअवघ्या सात महिन्यात घडलेल्या चौथ्या दुर्घटनेने फिलिपिनी संरक्षणदलाच्या क्षमतेवर सवाल उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात फिलिपिनी हवाईदलातील ‘हुय हेलिकॉप्टर’ला अपघात होऊन सातजणांचा बळी गेला होता. एप्रिल महिन्यात ‘एमडी-520 हेलिकॉप्टर’ कोसळून एकाचा बळी गेला होता. त्यापाठोपाठ गेल्या महिन्यात ‘ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर’ दुर्घटनाग्रस्त होऊन सहा जणांचा बळी गेला होता. फिलिपाईन्सचा संरक्षणविभाग दुय्यम दर्जाची उपकरणे व यंत्रणा खरेदी करीत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

मात्र रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर फिलिपाईन्सच्या संरक्षण विभागाने स्वतंत्र निवेदन देऊन हे आरोप फेटाळून लावले आहेत. साऊथ चायना सीमधील चीनच्या आक्रमक हालचाली, ‘अबु सय्यफ’सारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया व डाव्या सशस्त्र बंडखोर गटांकडून होणारे हल्ले या पार्श्‍वभूमीवर फिलिपिनी संरक्षणदलाची आधुनिकीकरणाची प्रक्रिया मंदावली आहे. सात महिन्यात हवाईदलात झालेले चार अपघात याचे परिणाम असल्याचा दावा काही विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply