भारताविरोधात ‘माईंड गेम’ सुरू आहे

- ‘प्रेस फ्रिडम इंडेक्स’वर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा आरोप

म्हैसूर – ‘प्रेस फ्रिडम इंडेक्स’ अर्थात पत्रकारितेला स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या देशांच्या यादीत भारताला १६१वे स्थान देण्याचा पराक्रम ‘रिपोर्टस्‌‍ विदाऊद बॉर्डर’ नावाच्या संघटनेने केला आहे. या यादीत अफगाणिस्तान भारताच्याही पुढे १५२व्या स्थानावर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात भारतापेक्षाही अधिक प्रमाणात पत्रकार व माध्यमे स्वतंत्र असल्याचा दावा या संघटनेने केल्याचे दिसते. काडीचीही विश्वासार्हता नसलेल्या या क्रमवारीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चांगलीच चपराक लगावली. अफगाणिस्तानपेक्षाही भारत अधिक भयावह आहे का? असा सवाल करून जयशंकर यांनी हा ‘माईंड गेम’ अर्थात प्रचारतंत्राचा भाग असल्याची टीका केली. त्याचवेळी भारत हा पत्रकारितेवर अजिबात नियंत्रण न ठेवणारा देश आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठासून सांगितले.

भारताविरोधात ‘माईंड गेम’ सुरू आहे - ‘प्रेस फ्रिडम इंडेक्स’वर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा आरोपजे देश आपल्याला आवडत नाहीत, पण इतरांना अतिशय आवडतात, त्यांचा अपप्रचार करण्याचा अशारितीने प्रयत्न केला जातो, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. काहीजण जाणीवपूर्वक भारताच्या विरोधात अशा कारवाया करीत असल्याचे संकेत देऊन भारताबाबत भ्रम पसरविला जात असल्याचा आरोप यावेळी जयशंकर यांनी केला. काही आठवड्यांपूर्वी ‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स’ अर्थात जगातील आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यातही भारताला जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आले होते. त्यावेळीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हा माईंड गेम असल्याचा ठपका ठेवला होता. यावेळी सिंगापूरमधील आपल्या एका मित्राचा दाखला जयशंकर यांनी दिला होता. भारतीय युरोपिय देशांमधील जनतेपेक्षा अधिक आनंदी असल्याचे आपल्याला या मित्राने सांगितले होते, अशी माहिती जयशंकर यांनी दिली होती.

अन्नधान्य व इंधनाची टंचाई आणि बेरोजगारीने ग्रासलेल्या पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमारमधील जनता भारतापेक्षाही अधिक आनंदी असल्याचे या वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये दाखविण्यात आले होते. त्याचाही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी समाचार घेतला होता. अशा प्रकारच्या याद्या प्रसिद्ध करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेवरच जयशंकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, युक्रेनच्या युद्धानंतर भारताने अमेरिका व युरोपिय देशांच्या दबावाला बळी न पडता तटस्थ धोरण स्वीकारले होते. आपल्या दडपणानंतरही भारताने रशियाबरोबरील आपले सहकार्य अबाधित ठेवले, उलट रशियाकडून इंधनाची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढविली, ही बाब अमेरिका व युरोपिय देशांना मान्य नाही. पण भारताच्या विरोधात उघड भूमिका घेणे आपल्याला महागात पडेल, याची जाणीव या देशांना झालेली आहे. म्हणूनच भारताच्या विरोधात शक्य तितका अपप्रचार करण्यासाठी अशा प्रकारचे ‘माईंड गेम’ केले जात आहेत. यात पाश्चिमात्य देशांची माध्यमे आणि काही भारतद्वेष्टे गट सहभागी झाल्याचे दिसते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वेळोवेळी याची जाणीव करून दिली होती.

काही आठवड्यांपूर्वी आपल्या अमेरिका दौऱ्यात भारतविरोधी मानसिकता प्रकर्षाने समोर आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी आपण अमेरिकेतील कार्यक्रमात भारताच्या आर्थिक प्रगतीचे दाखले दिले व त्याला मोठा प्रतिसादही मिळाला, अशी माहिती दिली. पण यानंतर अखेरचा प्रश्न विचारताना ‘भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत’, अशी शेरबाजी झाली. त्याने आपल्याला धक्का बसला होता, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. भारतातील अल्पसंख्यांक समुदाय सुरक्षित असून त्यांची संख्या वाढत आहे, याकडे आपण शेरेबाजी करणाऱ्यांचे लक्ष वेधले, असे सीतारामन पुढे म्हणाल्या. त्याचवेळी भारतावर दोषारोप करणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आणि तिथे त्यांच्यावर अत्याचार सुरू आहेत, याचीही जाणीव आपण उपस्थितांना करून दिली, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

भारताकडून आर्थिक सहकार्य मिळविल्याखेरीज गत्यंतर नाही, याची जाणीव झालेले पाश्चिमात्य देश मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे उपस्थित करून भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत. प्रेस फ्रिडम इन्डेक्स, हॅपिनेस इंडेक्स सारख्या याद्या प्रसिद्ध करून भारताला लक्ष्य करणे, हा या प्रयत्नांचाच भाग असल्याचे दिसते. मात्र आत्ताचा भारत अशा प्रकारचे दडपण स्वीकारणार नाही, उलट त्याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे स्पष्ट संकेत भारताच्या नेतृत्त्वाकडून दिले जात आहेत.

leave a reply