भारताला हवा असलेला आणखी एक दहशतवादी पाकिस्तानात ठार

लाहोर – भारतात ‘वाँटेड’ असलेला अतिरेकी परमजित सिंग पंजवर उर्फ मलिक सरदार सिंग याची शनिवारी पाकिस्तानात अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. पाकिस्तानच्या पंजाबमधील लाहोर शहरातील जोहर टाऊन येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी परमजित सिंग याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याला ठार केले. एक दिवस उलटल्यानंतरही पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक माहिती द्यायला तयार नाहीत. मात्र १९८६ सालापासून पाकिस्तानात आश्रय घेणाऱ्या परमजित सिंग ठार झाल्याने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना आणखी एक धक्का बसल्याचे दिसते. कारण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दबा धरून बसलेले दहशतवादी संघटनांचे नेते ठार झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.

भारताला हवा असलेला आणखी एक दहशतवादी पाकिस्तानात ठारभारतात घातपात घडविण्याचे गंभीर आरोप असलेला ६३ वर्षांचा परमजित सिंग पंजवर उर्फ मलिक सरदार सिंग लाहोरच्या जोहर टाऊन येथील सनफ्लावर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होता. शनिवारी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या परमजित सिंग याच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. परमजित सिंग याचा अंगरक्षक देखील यावेळी सोबत होता, पण तो काही करू शकला नाही. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. मात्र एक दिवस उलटल्यानंतरही पाकिस्तानचे अधिकारी आपण या प्रकरणावर प्रकाश टाकू शकत नाही, असे सांगत आहेत.

वरकरणी पाकिस्तानचे सरकार व माध्यमे या प्रकरणाला विशेष महत्त्व देत नसले, तरी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा परमजित सिंग याच्या हत्येमुळे धास्तावल्याचे दिसत आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर ‘बशिर अहमद पीर’ पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात ठार झाला होता. याच महिन्यात दहशतवादी गट अल बद्रचा नेता ‘सईद खालिद रझा’ याला कराचीमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून संपविले. फेब्रुवारी महिन्यातच ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या ‘एजाज अहन्गर’ उर्फ अबू उस्मान काश्मिरी याचा अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात ठार करण्यात आले होते.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या नेत्यांचा अशारितीने काटा काढला जात आहे, ही या देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी अतिशय गंभीर बाब मानली जाते. कित्येक वर्षांपासून पाकिस्तानात सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या या दहशतवाद्यांचा बचाव करणे पाकिस्तानच्या कुख्यात गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी अवघड बनत चालले आहे. यामुळे काही दहशतवादी ठार झाल्यानंतर आयएसआयला याचा मोठा धक्का बसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर आयएसआयने दहशतवाद्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. तरीही दहशतवादी संघटनांचे नेते ठार होत आहेत आणि त्यांच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागत नाही, ही आयएसआयसाठी चिंताजनक बाब ठरत असल्याचे दावे केले जातात.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हफीज सईद याच्या लाहोरमधील घराजवळ झालेल्या स्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. पण याचे पुरावे पाकिस्तान देऊ शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानचे हे आरोप खुद्द या देशातील माध्यमांनीच गंभीरपणे घेतले नव्हते.

मात्र आजवर पाकिस्तानने पोसलेले भारताच्या शत्रूंचा एकामागोमाग एक अशारितीने परस्पर काटा निघत आहे, यावर भारताचे माजी लष्करी अधिकारी अतिशय समाधान व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानात दहशतवादी संघटनांमध्ये देखील स्पर्धा असून या स्पर्धेतून दहशतवादी गट एकमेकांच्या नेते व कमांडर्सना संपवित असावेत, अशी शक्यताही या निमित्ताने समोर येत आहे. पण याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

हिंदी English

 

leave a reply