झॅपोरिझिआ प्रांतातील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात 25 जणांचा बळी

- रशिया व युक्रेनकडून परस्परांवर आरोप

किव्ह/मॉस्को – झॅपोरिझिआ प्रांतातील मानवतावादी पथकावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 25 जणांचा बळी गेला असून 50हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यावरून रशिया व युक्रेनमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. रशियन अधिकारी व्लादिमिर रोगोव्ह यांनी, युक्रेनच्या माऱ्यात बळी गेल्याचा दावा केला. तर युक्रेनने रशियाच्या क्षेपणास्त्रहल्ल्यात सामान्य नागरिक मारले गेल्याचा आरोप केला.

युक्रेनच्या ताब्यात असलेल्या झॅपोरिझिआ भागातून काही नागरिक रशियाच्या ताब्यातील क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी युक्रेनच्या फौजांनी त्यांच्यावर हल्ला चढविला असून हा हल्ला म्हणजे हत्याकांड असल्याचा ठपका रशियन अधिकाऱ्यांनी ठेवला. हल्ला झालेल्या क्षेत्रात स्फोटांचे 15 आवाज ऐकू आल्याचेही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनकडून त्यांच्याच भागातील सामान्य नागरिकांवर सातत्याने हल्ले चढविण्यात येत असल्याकडेही रशियन यंत्रणांनी लक्ष वेधले.

युक्रेनने झॅपोरिझिआमधील हल्ला रशियाने केल्याचा आरोप केला. रशियाने ‘एस-300’ क्षेपणास्त्राचा वापर करून हल्ला केल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्ये पडलेला मोठा खड्डा क्षेपणास्त्रहल्ल्याचा पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी जळलेली वाहने व मृतदेहांचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत. झॅपोरिझिआ शहरातील काही नागरिक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना दहशतवादी देश असलेल्या रशियाने हल्ला चढविल्याची टीका युक्रेनी यंत्रणांनी केली.

यापूर्वी झॅपोरिझिआच्या अणुप्रकल्पातील हल्ल्यांवरूनही रशिया व युक्रेनने परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. अणुप्रकल्पावरील हल्ल्यांसाठी युक्रेनने आत्मघाती ड्रोन्स वापरल्याचे दावे रशियाने केले होते. मात्र यासंदर्भातील स्पष्ट पुरावे समोर आलेले नसल्याने हल्ला कोण करतो आहे, याबद्दल ठोस माहिती उघड झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नवा हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply