‘मंकीपॉक्स’च्या संसर्गाची व्याप्ती वाढली

- आफ्रिका खंडाबाहेरील 27 देशांमध्ये जवळपास आठशे रुग्ण आढळले

संसर्गाची व्याप्तीवॉशिंग्टन/जीनिव्हा – गेल्या महिन्यात समोर आलेल्या ‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या संसर्गाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. आफ्रिका खंडाबाहेरील जवळपास 27 देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची साथ पसरली असून रुग्णांची संख्या आठशेच्या नजिक पोहोचली. ही संख्या वाढत असतानाच अमेरिकेत या विषाणूचे दोन ‘स्ट्रेन’ समोर आल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आफ्रिकेतही ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची व्याप्ती वाढत आहे. मध्य व पश्चिम आफ्रिकेतील पाच देशांमध्ये 1400हून अधिक रुग्ण आढळले असून 60हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

गेल्या महिन्यात आफ्रिका खंडातील नायजेरियामधून ब्रिटनमध्ये आलेल्या एका व्यक्तीला ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांमध्ये हा विषाणू 27 देशांमध्ये पसरला असून त्यात प्रामुख्याने युरोपिय देशांचा समावेश आहे. युरोपव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, लॅटिन अमेरिका तसेच आखाती देशांमध्येही याचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. 2 जूनपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 780वर पोहोचली आहे.

संसर्गाची व्याप्तीसर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांमध्ये चार युरोपिय देशांसह कॅनडाचा समावेश आहे. ब्रिटनमधील रुग्णांची संख्या 200वर गेली असून त्यापाठोपाठ स्पेनमध्ये 156 रुग्ण आढळले आहेत. पोर्तुगालमध्ये 138, कॅनडात 58 तर जर्मनीत 57 रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत 11 प्रांतांमध्ये 21 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची माहिती स्थानिक आरोग्ययंत्रणेने दिली. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये 27 देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’ पसरल्याने आरोग्ययंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेत या विषाणूचे दोन वेगवेगळे स्ट्रेन असल्याचा दावा स्थानिक यंत्रणांनी केला आहे. त्याचवेळी देशात अनेक रुग्णांची नोंद झाली नसल्याचा दावा आरोग्यतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात अमेरिकेत ‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या रुग्णांची संख्या वाढलेली असेल, अशी भीती व्यक्त करण्यात येते.

संसर्गाची व्याप्तीदरम्यान, आफ्रिका खंडातही ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची व्याप्ती वाढत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सुमारे सात आफ्रिकी देशांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिली. त्यात डीआर काँगो, नायजेरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कॅमेरून, लायबेरिया, सिएरा लिऑन व काँगो-ब्राझव्हिल या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये आतापर्यंत 1,405 रुग्ण आढळले असून 66 जण दगावल्याचे ‘डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले. ही आकडेवारी जानेवारी ते मे या पाच महिन्यातील असल्याचा खुलासाही जागतिक आरोग्य संघटनेने केला.

1970 साली आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास 10 आफ्रिकी देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या साथी येऊन गेल्या आहेत.

leave a reply