बायडेन प्रशासन चिनी उत्पादनांवरील करात कपात करणार

करात कपातवॉशिंग्टन – युरोपची सुरक्षा, अर्थव्यवस्था व मुल्यांना चीनपासून मोठा धोका आहे. अशा या चीनविरोधी संघर्षात युरोपने अमेरिकेला साथ द्यावी, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री वेंडी शर्मन यांनी केले होते. याला तीन दिवस उलटत नाही तोच, चिनी उत्पादनांवर लादलेल्या करात कपात करण्याचे संकेत बायडेन प्रशासनाने दिले आहेत. यामुळे युरोपिय देशांना चीनविरोधात चिथावणी देणारे बायडेन प्रशासन स्वत: मात्र चीनला करसवलती देत असल्याचे उघडझाले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री वेंडी शर्मन यांनी माध्यमांशी बोलताना, युरोपला चीनकडून वाढत असलेल्या धोक्यांचा इशारा दिला. ‘फेब्रुवारी महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी परस्पर सहकार्याला मर्यादा नसल्याचे जाहीर केले होते. हे सहकार्य युरोपसाठी धोकादायक ठरू शकते. पण त्याच्याही आधी चीनकडून युरोपची सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि मुल्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे’, असे शर्मन यांनी बजावले होते.

चीन हा युरोपपासून हजारो मैल अंतरावर असला तरी या देशाच्या कारवाया युरोपच्या भविष्यासाठी मारक ठरू शकतात, याची आठवण अमेरिकेच्या उपमंत्र्यांनी करून दिली. त्यामुळे युरोपने चीनविरोधी संघर्षात अमेरिकेला साथ द्यावी, असे आवाहन शर्मन यांनी केले. पण अमेरिकेला चीनबरोबर नवे शीतयुद्ध छेडायचे नाही किंवा चीनबरोबर आर्थिक सहकार्य देखील तोडायचे नाही, असेही शर्मन पुढे म्हणाल्या.

करात कपातबायडेन प्रशासनाच्या गोंधळात टाकणाऱ्या या भूमिकेला दोन दिवसही उलटत नाही तोच, अमेरिकेच्या व्यापारमंत्री गिना रायमोंडो यांनी चीनच्या उत्पादनांवरील करात कपात करण्याचे संकेत दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यासाठी हालचाली सुरू करण्याची सूचना केल्याची माहिती व्यापारमंत्री गिना यांनी दिली. गेल्या चाळीस वर्षांच्या तुलनेत अमेरिकेतील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनवरील शुल्ककपात करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अमेरिकेच्या व्यापारमंत्र्यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात व्यापार युद्ध पुकारले होते. याअंतर्गत अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर जबरदस्त शुल्क लादले होते. याचा जबर फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसल्याच्या बातम्या आल्या होत्या. अमेरिकेच्या विद्यमान व्यापारमंत्री गिना रायमोंडो यांनी देखील ट्रम्प प्रशासनकाळात चीनवर लादलेले काही निर्बंध परिणामकारक असल्याची कबुली देखील दिली होती. पण आता अमेरिकेतील महागाईचे कारण पुढे करून अमेरिका चीनच्या उत्पादनांवरील करात कपात करीत आहे. पण युरोपिय देशांनी मात्र चीनबाबत वेगळी भूमिका स्वीकारावी, अशी बायडेन प्रशासनाची अपेक्षा असल्याच दिसते.

चीनच्या विस्तारवादी धोरणांविरोधात बायडेन प्रशासन ठाम भूमिका घेत नसल्याची तक्रार अमेरिकेचे मित्रदेश करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान ॲबे शिंजो यांनी तैवानबाबतच्या बायडेन प्रशासनाच्या गोंधळलेल्या भूमिकेवर टीका केली होती. आता व्यापारात सवलती देऊन अमेरिका चीनला दडपणातून मुक्त करीत असल्याचे दिसत आहे. याचा फार मोठा फायदा चीनला मिळणार असून यामुळे तैवान तसेच चीनच्या आक्रमकतेपासून धोका असलेल्या इतर देशांसमोरील समस्याअधिकच वाढणार आहेत.

leave a reply