नायजेरियातील अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळांमुळे मंकीपॉक्स पसरला

- रशियन संरक्षण विभागाचा गंभीर आरोप

मंकीपॉक्समॉस्को – 20 हून अधिक देशांमध्ये आढळलेले ‘मंकीपॉक्स’चे अडीचशेहून अधिक रुग्ण म्हणजे हिमनगाचे वरचे टोक आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. हा इशारा मंकीपॉक्सच्या साथीची भीषणता स्पष्ट करणारा ठरतो. मात्र रशियाच्या संरक्षण विभागाने याहूनही अधिक भयंकर आरोप केला आहे. नायजेरियामध्ये कार्यान्वित असलेल्या अमेरिकेच्या चार जैविक प्रयोगशाळांमधून मंकीपॉक्स पसरविण्यात आल्याचा ठपका रशियाच्या संरक्षण विभागाने ठेवला. डब्ल्यूएचओने याची चौकशी करावी, अशी मागणी रशियाने केली आहे.

रशियन संरक्षण विभागाच्या ‘रेडिएशन केमिकल अँड बायोलॉजिकल डिफेन्स ट्रूफ्स’चे प्रमुख ‘इगोर किरिल्लोव्ह’ यांनी अमेरिकेवर हा गंभीर आरोप केला. रशियन वृत्तसंस्था स्फुटनिकमध्ये किरिल्लोव्ह यांनी केलेल्ा आरोपांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. नायजेरियामध्ये मंकीपॉक्सचा उदय झाल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले होते. या देशात अमेरिकेच्या कमीत कमी चार जैविक प्रयोगशाळा कार्यरत आहेत, हा योगायोग नाही. तर या प्रयोगशाळांमधूनच मंकीपॉक्स पसरविण्यात आल्याचा दावा किरिल्लोव्ह यांनी केला आहे.

ही अत्यंत गंभीर बाब ठरते आणि डब्ल्यूएचओने याची चौकशी करायलाच हवी, अशी मागणी किरिल्लोव्ह यांनी केली. याआधीही अमेरिका जैविक प्रयोगांपासून असलेला धोका टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेत नसल्याचे उघडझाले आहे. अमेरिकेचे जैवविषयक व्यवस्थापन प्रभावी नाही, असा ठपका किरिल्लोव्ह यांनी ठेवला. अमेरिकेच्या या अव्यवस्थेचा लाभ दहशतवादी घेऊ शकतात, याकडेही किरिल्लोव्ह यांनी लक्ष वेधले.

मंकीपॉक्स2014 ते 2021 या कालावधित ‘युएस फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन’, ‘द युएस आर्मी मेडिकल रिसर्च इन्स्टीट्यूट ऑफ इंन्फिशिअस डिझिज्‌‍ इन मेरिलँड’, ‘सेंटर फॉर व्हॅक्सिन रिसर्च इन पेन्सेल्वानिया’ या अमेरिकेच्या संस्था जैविक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याकड कुणाचेही लक्ष गेलेले नाही. त्याबाबत अमेरिकेला कुणीही जाब विचारलेला नाही, याकडेही इगोर किरिल्लोव्ह यांनी लक्ष वेधले. 1996 साली केलेल्या डब्ल्यूएचओच्या विषाणूंबाबत नियमांचे उल्लंघन अमेरिकेच्या या साऱ्या प्रयोगशाळा करीत आहेत, असा आणखी एक आरोप किरिल्लोव्ह यांनी केला.

दरम्यान, याआधी युक्रेनमधील अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळा सक्रीय होत्या, पण रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर तातडीने या प्रयोगशाळा बंद करण्यात आल्याचा आरोप रशियाने केला. इतकेच नाही तर अमेरिकेच्या या युक्रेनमधील प्रयोगशाळांद्वारे युक्रेनी विद्यार्थ्यांवर प्रयोग करण्यात आले व त्यासाठी प्रयोगशाळेतील उंदिरांसारखा वापर करण्यात आला, असा दावा रशियाने केला होता. हे आरोप अमेरिकेने फेटाळले आहेत. अशा परिस्थितीत मंकीपॉक्सबाबत अमेरिकेवर अधिक गंभीर आरोप करून रशियाने आपण याचा पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मंकीपॉक्सची साथ अधिक तीव्रतेने पसरली तर रशियाच्या आरोपांना इतर देशांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

leave a reply