युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांची तुर्कीला भेट

इस्तंबूल – संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) परराष्ट्रमंत्री ‘शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान’ यांनी तुर्कीचा दौरा करून तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची भेट घेतली. युएई व तुर्कीच्या सहकार्यावर यावेळी चर्चा पार पडली. दोन्ही देशांनी आपले सर्वच स्तरावरील सहकार्य वाढविण्याचा निर्णयघेतला आहे. उभय देशांमधील सध्या आठ अब्ज डॉलर्सवर असलेला वार्षिक व्यापार पुढच्या काळात 10 अब्ज डॉलर्सवर नेण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र या व्यापारी सहकार्यापेक्षा तुर्कीचे युएई आणि सौदी अरेबियाशी नव्याने विकसित होत असलेले संबंध हा चर्चेचा विषय बनला आहे.

UAE-turkeyसौदी अरेबिया आणि युएई या आखातातील प्रभावशाली देशांवर तुर्कीने गेल्या काही वर्षांपासून सडकून टीका केली होती. इस्लामी जगताचे नेतृत्त्व करणारे हे देश आपली जबाबदारी योग्यरित्या पार पडत नसल्याची टीका तुर्कीने केली होती. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी जहाल भाषेत केलेल्या या टीकेमुळे सौदी-युएईसह इतर आखाती देश दुखावले गेले होते. याचा या देशांच्या तुर्कीबरोबरील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला होता. मात्र इस्लामी जगाचे नेतृत्त्व करण्याची महत्त्वाकंक्षा असलेल्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी त्यावेळी त्याची पर्वा केली नव्हती.

मात्र अलिकडच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आखाती देशांसह अमेरिका व युरोपिय देशांबरोबरही तुर्कीचे संबंध ताणले गेले आहेत. याचा परिणाम तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. तुर्कीची आर्थिक घसरण राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या नेतृत्त्वाला धक्का देणारी असल्याचे मानले जाते. यामुळे सावध झालेल्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल केले. इस्रायलबरोबर संपुष्टात आलेले द्विपक्षीय संबंध राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी नव्याने प्रस्थापित केले आहेत.

अब्राहम करारानुसार इस्रायलशी द्विपक्षीय सहकार्य करणाऱ्या युएई व इतर आखाती देशांवर आगपाखड करणाऱ्या तुर्कीच्या धोरणात झालेला हा बदल लक्षणीय ठरतो. याच्या पाठोपाठ तुर्कीने सौदी तसेच युएईबरोबरील संबंध पूर्ववत करण्यासाठी वेगाने पावले उचललीआहेत. युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांचा तुर्की दौरा ही बाब अधोरेखित करीत आहे. युएई व तुर्की केवळ द्विपक्षीय सहकार्यच नाही, तर इतर देशांबरोबरील सहकार्याला चालना देतील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

आखाती क्षेत्राला युरोपशी जोडणाऱ्या प्रकल्पाला व व्यापक व्यापारी करारांना युएई आणि तुर्की महत्त्व देणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. ही युएई आणि तुर्कीमधील सहकार्यातील अत्यंत महत्त्वाची बाब ठरू शकते. तुर्कीच्या आखाती देश व इस्रायलबाबतच्या धोरणात झालेला फार मोठा बदल आणि या देशांकडून तुर्कीला मिळणारा प्रतिसाद या क्षेत्रातील राजकारण वेग घेत असल्याचे दाखवून देत आहे. आधीच्या काळात तुर्कीने इराणबरोबरील आपल्या संबंधांना आखाती देशांबरोबरील सहकार्यापेक्षा अधिक महत्त्व दिले होते. त्यामुळे तुर्कीच्या धोरणात झालेला बदल निरिक्षकांचे लक्ष वेधूनघेत आहे.

leave a reply