अमेरिकी व युरोपिय शिष्टमंडळाच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून तैवानमध्ये ४०हून अधिक विमानांची घुसखोरी

तैपेई/बीजिंग – अमेरिका व युरोपचे शिष्टमंडळ तैवानला भेट देत असतानाच चीनच्या ४०हून अधिक विमानांनी हवाईहद्दीत घुसखोरी केली. या घुसखोरीमुळे चीन-तैवान क्षेत्रातील परिस्थिती अधिकच बिघडल्याचा इशारा तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी, चीनची एकाधिकारशाही व अपप्रचाराविरोधात तैवान व युरोपने एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या पाच संसद सदस्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ तैवान भेटीवर आले होते. त्यानंतर आता रविवारी युरोपमधील तीन बाल्टिक देशांच्या संसद सदस्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ तैेवानमध्ये दाखल झाले. यात लिथुआनिया, लाटविया व इस्टोनिया या देशांच्या संसद सदस्यांचा समावेश आहे. अमेरिका व युरोपिय देश तैवानबरोबरील राजनैतिक संबंध अधिक बळकट करीत असल्याने चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. या वाढत्या सहकार्याचा निषेध करण्यासाठी चीनने घुसखोरी करून तैवानवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकी व युरोपिय शिष्टमंडळाच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून तैवानमध्ये ४०हून अधिक विमानांची घुसखोरीशुक्रवार ते सोमवार या चार दिवसांच्या अवधीत चीनच्या ४४ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. सर्वात मोठी घुसखोरी रविवारी झाली असून तब्बल २७ विमाने तैवानच्या हद्दीत आली होती. त्यात आठ ‘जे-१६’, सहा ‘जे-१०’, चार ‘जे-११’, पाच ‘शिआन एच-६ बॉम्बर्स’, दोन ‘केजे-५०० अर्ली वॉर्निंग एअक्राफ्टस्’, ‘वाय-९ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एअरक्राफ्ट’ व ‘शिआन वाय-२०यु एरिअल टँकर’चा समावेश होता. चीनच्या हवाईदलाने एरिअल टँकर पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली आहे. सोमवारी पाच विमानांची घुसखोरी उघड झाली असून त्यात दोन ‘जे-१६’, दोन ‘जे-१०’सह एका ‘वाय-८ अँटी सबमरिन वॉरफेअर एअरक्राफ्ट’चा सहभाग होता.

नी विमानांची ही घुसखोरी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीनंतरची सर्वात मोठी घुसखोरी ठरते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात चीनची सुमारे दीडशे विमाने तैवानच्या हद्दीत घुसली होती. या घुसखोरीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. चीनच्या नव्या घुसखोरीवर तैवानने चिंता व्यक्त केली आहे.अमेरिकी व युरोपिय शिष्टमंडळाच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून तैवानमध्ये ४०हून अधिक विमानांची घुसखोरी चिनी विमानांच्या हालचालींमुळे चीन-तैवान क्षेत्रातील वातावरण अधिकच बिघडते आहे, असे तैवानचे संरक्षणमंत्री चु कुओ-चेंग यांनी बजावले. तर तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी, चीनने कितीही लष्करी दबाव टाकला तरी तैवान कधीच झुकणार नाही, असा इशारा दिला.

दरम्यान, रविवारी तैवानमध्ये दाखल झालेल्या युरोपिय देशांच्या संसद सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी, लोकशाहीच्या सुरक्षेसाठी युरोप व तैवानने एकजूट दाखवायला हवी, असे आवाहन केले. तर युरोप तैवानच्या बरोबर आहे हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे दाखल झालो आहोत, अशी ग्वाही युरोपिय शिष्टमंडळाने दिली. युरोपचे संसदीय शिष्टमंडळ आठ दिवसांच्या तैवान दौर्‍यावर आहे.

leave a reply