चीनसह जपानमध्ये कोरोना संसर्गाची तीव्रता वाढली जपानमध्ये 24 तासात 400हून अधिक जण दगावले

corona infection-chinaबीजिंग/टोकिओ – ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करणाऱ्या चीनमध्ये कोरोनाच्या साथीने हाहाकार उडविल्याची माहिती समोर येत आहे. चीनमधील कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असून हॉस्पिटल्स व दफनभूमींमध्ये मोठ्या रांगा लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत आहेत. चीनपाठोपाठ जपानमध्येही कोरोनाची नवी लाट आली असून गेल्या 24 तासांमध्ये 400हून अधिक रुग्ण दगावल्याचे स्थानिक यंत्रणांकडून सांगण्यात आले. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जपानी माध्यमांनी म्हटले आहे.

corona infectionया महिन्याच्या सुरुवातीला चीनने कोरोनाची साथ रोखण्यासाठी लादलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनमधील बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चीनमधील कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात चीनमध्ये 24 तासांच्या अवधीत कोरोनाचे तब्बल 3 कोटी, 70 लाख रुग्ण आढळल्याचे वृत्त अमेरिकेतील आघाडीची वेबसाईट ‘ब्लूमबर्ग’ने दिले होते. चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’च्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर ही आकडेवारी प्रसिद्ध करीत असल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले होते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्येच चीनच्या लोकसंख्येपैकी 18 टक्के जनतेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाजही नॅशनल हेल्थ कमिशन’च्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचेही अमेरिकी वेबसाईटने प्रसिद्ध केले होते.

us-covid-travel-latest-rules-regulationsचीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. उलट चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ने दररोज जाहीर करण्यात येणारी कोरोनाची आकडेवारी प्रसिद्ध करणे बंद केले आहे. त्यामुळे चीनमधील संसर्गाची अधिकृत माहिती मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. मात्र चीनमधील सोशल मीडिया व इतर माध्यमे देशात कोरोनाच्या संसर्गाने उडविलेल्या हाहाकाराची माहिती तसेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध करीत आहेत. त्यात चीनच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची गर्दी दाखविण्यात आली असून कोरोनाचे रुग्ण व मृतदेह एकाच खोलीत ठेवण्यात आले आहेत.

japan covid dataहॉस्पिटल्समधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत असल्याची माहितीही प्रसिद्ध झाली आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये कोरोनाविरोधात देण्यात येणाऱ्या औषधांचा साठाही संपल्याचे सांगण्यात येते. मोठ्या शहरांच्या हॉस्पिटल्समधील आयसीयू बेड्स जवळपास पूर्णपणे भरल्याचे दावेही करण्यात येत आहेत. चेंगडू शहरातील दफनभूमीत दिवसाला जवळपास 200 मृतदेह येत असल्याची माहिती स्थानिक कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

दरम्यान, चीनमधील या वाढत्या कोरोनामुळे शेजारी देशांमध्येही रुग्णसंख्या व कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे उघड झाले आहे. जपानमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची नवी लाट आली असून रुग्णसंख्या तसेच बळींची आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मंगळवारी जपानमध्ये तब्बल दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनाच्या संसर्गामुळे 438 जण दगावल्याची माहिती ‘असाही शिंबून’ या आघाडीच्या दैनिकाने दिली आहे. कोरोनाच्या साथीत जपानमध्ये एवढ्या मोठ्या संख्येेने रुग्ण दगावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. जपानमधील एकूण रुग्णसंख्या 2 कोटी, 85 लाखांवर गेली असून 56 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर नवे निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply