पाकिस्तानच्या लाहोरमध्येच कोरोनाव्हायरसचे साडे सहा लाखांहून अधिक रुग्ण – पाकिस्तानी माध्यमांमध्ये धक्कादायक अहवालाचा गौप्यस्फोट

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसने १४३९ जणांचा बळी घेतला आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या ७७,८३६ इतकी आहे. पण पाकिस्तानच्या एकट्या लाहोर शहरात या साथीच्या रुणांची संख्या जवळपास सहा लाखांहून अधिक असल्याची भयंकर बाब समोर आली आहे. पाकिस्तानच्या यंत्रणा व सरकार कोरोनाचा उद्रेक लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र यामुळे पाकिस्तानात इटली पेक्षाही भयंकर स्थिती निर्माण होईल, असा इशारा पाकिस्तानी डॉक्टरांच्या संघटना देत आहेत. संपूर्ण पाकिस्तानात मिळून कोरोनाव्हायरसचे सुमारे ७७ हजार रुग्ण असल्याची माहिती दिली जाते. ही माहिती खरी नसून या साथीबाबत पाकिस्तानचे सरकार बरेच काही दडवीत आहे ,अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाने पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्येच सुमारे सहा लाख ७० हजाराहून अधिक संख्येने कोरोनाव्हायरसचे रुग्ण असल्याचा दावा केला. या सचिवांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आलेली आहे. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर घबराहट पसरली आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून हे रुग्ण चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. त्यांच्यामार्फत कोरोनाची साथ झपाट्याने फैलावत आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही बाब उघड झाल्यानंतर कोरोनाव्हायरसवरून थापा मारणाऱ्या पाकिस्तानी सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे. पाकिस्तानकडे वेंटिलेटर्स आहेत पण कोरोनाचे रुग्ण नसल्याचे दावे पाकिस्तानचे नेते करीत होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी असल्याचे उघड होत आहे.

पाकिस्तान, लाहोर, कोरोनाव्हायरस

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत तसेच इतर देशांचे अनुकरण करून वेळीच लॉकडाऊन लागू केले असते , तर पाकिस्तानवर ही वेळ आली नसती. त्याऐवजी इम्रान खान यांच्या सरकारने बेपर्वाई दाखवली, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते माध्यमे व इम्रान खान यांचे समर्थकही करू लागले आहेत. पाकिस्तानच्या डॉक्टरांनी तर देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, याची जाणीव जनतेला करून दिली असून निदान आता तरी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळा, असे कळकळीचे आवाहन केले आहे. पाकिस्तानात इतकी भयंकर परिस्थिती उद्भवलेली असली तरी पंतप्रधान इम्रान खान आपल्या धोरणाचे जोरदार समर्थन करीत आहेत. पाकिस्तान सारख्या गरीब देशात लॉकडाऊन परवडणारे नाही, असा इम्रान खान यांचा दावा आहे. म्हणूनच या साथीचा उद्रेक झाला तरी इम्रान खान पाकिस्तानात लॉकडाऊन करायला तयार नाही. त्यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानने महाभयंकर मानवी आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार राहावे, अशी हताश प्रतिक्रिया या देशातील समंजस विश्लेषक व पत्रकार देऊ लागले आहेत.

leave a reply