हिंसा थांबली नाही तर अमेरिकेत लष्कर तैनात करणार – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन – जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्युनंतर अमेरिकेच्या विविध भागांमध्ये सुरू झालेला हिंसाचार रोखण्यात स्थानिक यंत्रणा अपयशी ठरल्या तर देशात लष्कर तैनात करावे लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेत पेटलेल्या हिंसाचारामागे ‘अँटिफा’ ही कट्टर संघटना व अराजकवादी असल्याचा आरोपही केला. अमेरिकेतील ७५ हून अधिक शहरांमध्ये निदर्शने सुरू असून ४० हून अधिक शहरांमध्ये संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांवर हल्ले तसेच जाळपोळ लुटालूट करणाऱ्या पाच हजारांहून अधिक दंगेखोरांना सुरक्षायंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

अमेरिका, लष्कर, डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या मिनीआपोलिस शहरात गेल्या आठवड्यात एका पोलिसी कारवाईत जॉर्ज फ्लॉईड या ४६ वर्षाच्या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या डेरेक शॉविन या पोलिस अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र तरीही अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा पुढे करून देशभरात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करणारी निदर्शने सुरू झाली आहेत. गेले सात दिवस सुरू असणाऱ्या या निदर्शनांना हिंसक वळण लागले असून अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ व लुटालूट सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या २४ राज्यांमधील अनेक शहरांमध्ये तब्बल १६ हजारांहून अधिक ‘नॅशनल गार्ड’चे जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही हिंसाचार आटोक्यात येत नसल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या काही राज्यांमधील स्थानिक प्रशासन योग्य सहकार्य करत नसल्याचा ठपकाही ठेवला.

अमेरिका, लष्कर, डोनाल्ड ट्रम्प

‘अमेरिकेतील शहरे व राज्यांमधील स्थानिक प्रशासन आणीबाणीच्या काळात राखीव लष्करी दल असलेल्या नॅशनल गार्डला तैनात करू शकते. त्यांची पुरेशी तैनाती परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. पण जर स्थानिक प्रशासनाने आवश्यक कारवाई करण्यास विरोध दर्शविला तर मी तातडीने अमेरिकेचे लष्कर त्या भागांमध्ये तैनात करेन आणि परिस्थिती नियंत्रणात आणेन’, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला.यावेळी ट्रम्प यांनी देशभरात सुरू असणाऱ्या हिंसक घटनांमागे काही विशिष्ट गट असल्याचा आरोप करून त्यांची गय केली जाणार नाही, असेही बजावले.

‘”अमेरिकेत सुरू असणाऱ्या हिंसाचारामागे ‘अराजकाचा व्यवसाय करणारे’ आणि ‘कट्टरवादी’ असणारे ‘अँटिफा’सारखे गट आहेत. देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या गटांना गुन्हेगारी स्वरूपाची जबरदस्त शिक्षा भोगावी लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावे’, अशा आक्रमक शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्णायक कारवाईचे संकेत दिले. रविवारी ट्रम्प यांनी ‘अँटिफा’ला लवकरच दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात येईल असा इशारा दिला होता. फ्लॉईड यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या अमेरिकी जनतेचा संताप न्याय्य असला तरी हिंसक जमावाकडून त्याचा गैरफायदा उचलण्यात येत आहे, असा दावाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

व्हाईट हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लष्करी तैनातीचा इशारा देण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राजधानी वॉशिंग्टनमधील ‘सेंट जॉन्स चर्च’ला भेट दिली. रविवारी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या हिंसाचारात दंगेखोर जमावाने या चर्चची मोडतोड केली होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची भेट लक्ष वेधून घेणारी ठरते. दरम्यान, ट्रम्प यांनी लष्करी तैनातीबाबत दिलेल्या इशाऱ्यावर विरोधी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. डेमोक्रॅट पक्षाचे नेते व माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकी जनतेविरोधात देशाच्या लष्कराचा वापर करीत आहेत असे टीकास्त्र सोडले.

leave a reply