रशियाच्या चेचेन फौजांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे सहाशेहून अधिक जवान ठार

चेचेन नेते रमझान कादिरोव्ह

ramzan kadyrovमॉस्को/किव्ह – रशियन लष्कराचा भाग असलेल्या चेचेन पथकांनी दक्षिण तसेच मध्य युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये 650 हून अधिक युक्रेनी जवानांचा बळी गेल्याची माहिती चेचेन नेते रमझान कादिरोव्ह यांनी दिली. चेचेन्या प्रांतातील लष्कराचा भाग असलेले 10 हजारांहून अधिक जवान रशियाच्या युक्रेन मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांना डोन्बाससह दक्षिण युक्रेनमध्ये तैनात करण्यात आले आहे. कादिरोव्ह चेचेन तुकड्यांच्या कामगिरीची माहिती देत असतानाच युक्रेनने क्रिमिआ प्रांतात पुन्हा ड्रोनहल्ले चढविल्याचे समोर आले. या हल्ल्यात एका युद्धनौकेचे नुकसान झाल्याचा दावा रशियन यंत्रणांनी केला आहे.

Kherson-Mykolaiv Battle Mapगेल्या काही दिवसात रशिया-युक्रेन संघर्ष अधिक प्रखर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाकडून युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर जबरदस्त क्षेपणास्त्रहल्ले सुरू आहेत. त्याचवेळी युक्रेनचे लष्कर खेर्सन तसेच उत्तर युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असलेला भाग पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. रशियन फौजांकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळत असून युक्रेनी लष्कराला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे कादिरोव्ह यांनी दिलेल्या माहितीवरून दिसून येते.

चेचेन तुकड्यांनी दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह तसेच मध्य युक्रेनमधील क्रायव्हि रिव्ह शहरांवर हल्ले केल्याचे समोर आले आहे. 25 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत केलेल्या कारवाईत चेचेन तुकड्यांनी युक्रेनच्या 657 जवानांना ठार केल्याचे कादिरोव्ह यांनी सांगितले. युक्रेनचे 300 जवान जखमी झाले आहेत. त्याचवेळी युक्रेनची सशस्त्र वाहने, तोफा, रणगाडे व इतर संरक्षणयंत्रणा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्याची माहितीही त्यांनी दिली. तर खेर्सन प्रांतात झालेल्या संघर्षात 23 चेचेन जवानांचा बळी गेला असून 50हून अधिक जखमी झाल्याचेही कादिरोव्ह यांनी म्हटले आहे.

Russia's Chechen forcesचेचेन तुकड्या दक्षिण व मध्य युक्रेनमध्ये हल्ले चढवित असतानाच रशियन फौजा डोन्बासमधील बाखमत शहरानजिक पोचल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला. गेले काही दिवस बाखमतच्या सीमाभागात युक्रेन व रशियन लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरू असून पुढील आठवड्यात रशिया बाखमतमध्ये प्रवेश करु शकतो, असे संकेत मिळत आहेत. डोन्बासमधील आघाडीचा विचार करता बाखमतवरील ताबा रशियन लष्करासाठी महत्त्वाचा ठरतो, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.

दरम्यान, युक्रेनने रशियाच्या ताब्यातील क्रिमिआवर पुन्हा ड्रोनहल्ले चढविले आहेत. क्रिमिआतील रशियन नौदलाचा तळ असणाऱ्या सेव्हॅस्टोपोल बंदरावर हे हल्ले करण्यात आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यांमध्ये रशियाच्या एका युद्धनौकेचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. यावेळी युक्रेनने अंडरवॉटर ड्रोन्सचा वापर केल्याचे दावेही करण्यात आले आहेत. रशियाने युक्रेनचे ड्रोन्स नष्ट केल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यात सेव्हॅस्टोपोल बंदरात झालेला हा तिसरा ड्रोनहल्ला ठरला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला ड्रोनच्या सहाय्याने हल्ले चढविण्यात आले होते. शनिवारी झालेल्या हल्ल्यांसाठी ब्रिटनच्या यंत्रणांनी युक्रेनला सहाय्य केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला.

leave a reply